पुणे : गेल्या काही दिवसांपासून शांत असणारे अजित पवार आज पुन्हा एकदा त्यांच्या नेहमीच्या शैलीत पाहायला मिळाले. पुण्यातल्या कोविड-१९ हॉस्पिटलच्या उद्घाटनानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये उत्तरं दिली. पत्रकारांशी संवाद साधण्याआधी अजितदादांनी माध्यमांच्या माईकवर (बूम) सॅनिटायजर मारला. (पाहा व्हिडिओ)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मंगळवारपासून हे हॉस्पिटल सुरू होईल. आता निर्जंतुकीकरण होईल, नाहीतर लगेच उद्या अजून कसं सुरू झालं नाही, म्हणतील. कालंच उद्घाटन झालं अजून सुरू कसं झालं नाही दाखवतील', असं अजित पवार म्हणाले. 


अरे कशाचा दाऊद?


दाऊद कराचीमध्ये असल्याची कबुली पाकिस्तानने दिली असल्याचा प्रश्नही अजितदादांना विचारला त्यावरही त्यांनी टोलेबाजी केली. 'अरे कशाचा दाऊद करत बसला. काहीतरी कोणीतरी टीव्हीला दाखवतं. काल दाखवलं दाऊद पाकिस्तानमध्ये, आज दाखवलं दाऊद आमच्याकडे नाही. तो एका दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा आहे. वातावरण खराब करण्याचं काम त्या टोळीनं केलं. केंद्र आणि संबंधित अधिकारी चर्चा करतील आणि निर्णय घेतील. ते सक्षम आहेत, आम्ही त्यात वक्तव्य करणं बरोबर नाही,' अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. 


पार्थ प्रश्नावर मौन


दरम्यान पार्थ पवार यांच्याबद्दलही अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला. 'ज्या विषयावर मी बोलणारच नाही, त्या विषयावर बोलून काय फायदा?' असं म्हणून अजित पवार निघून गेले. 


देशात कुठेही फिरण्यासाठी आता ई-पास बंद करावेत, असं केंद्र सरकारने सांगतिलं आहे. या विषयावर मी मुख्यमंत्र्यांशी बोलेन, गृहमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली आहे. केंद्र सरकारने देशाला डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला आहे, असं अजित पवार म्हणाले.


पुण्याच्या सीओईपी मैदानात कोविड-१९ हॉस्पिटलचं लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन हजेरी लावली.