33 वर्षांच्या राजकारणात अजित पवार पहिल्यांदाच संघ मुख्यालयात; मदनदास देवी यांचे घेतले अंत्यदर्शन
Ajit Pawar : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह मदनदास देवी यांच्या अंत्यदर्शनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात दाखल झाले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सोबत होते.
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) माजी सह सरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटन मंत्री मदनदास देवी (Madandas Devi) यांचे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते घरीच होते. पुण्यातील (Pune News) वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मात्र त्याआधी मदनदास देवी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी पुण्यातील मोतीबाग या संघाच्या कार्यालयात ठेवण्यात आले होतं. यावेळी मोतीबागमध्ये अंत्यदर्शनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), राष्ट्रीय स्वयंसंघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat), सर कार्यवाह दत्तात्रय होजबले , सह सरकार्यवाह सुरेश सोहनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे . पी.नड्डा हे पुण्यात दाखल झाले होते.
महत्त्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील मुंबईहून एकत्रच पुण्यात दाखल झाले होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एकत्रच मदनदास देवी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतलं आहे.अंत्यदर्शनानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेऊन चर्चा केली आहे.
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार हे पहिल्यांदाच पुण्यात आले होते. मुंबईहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच अजित पवार पुण्यात दाखल झाले होते. पुणे विमानतळ येथून थेट ते पुण्याचे राष्ट्रीय सवयंसेवक संघाचे मुख्यालय असणाऱ्या मोतीबाग येथे पोहोचले होते. त्याठिकाणी मदनदास देवी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतलं.
दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांची भाजपसोबत जवळीक वाढली असल्याचे आत्तापर्यंत झालेल्या अनेक कार्यक्रमात दिसून आले आहे आहेत.अजित पवार हे एनडीएचे घटक झाल्यानंतर प्रथमच थेट संघाच्या पुण्याच्या मुख्यालयात गेले असल्याने पाहायला मिळाले. यामुळे युतीचे हे राजकीय बंध आता भावनिक विचारांशी देखील जोडले जात असल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.