अजित पवार मुख्यमंत्री होणं, हे स्वप्नच राहणार; शरद पवार यांचे मोठं विधान
अजित पवार गटानं पवारांना हुकूमशहा म्हटलं. वयाच्या मुद्द्यावरुन अजित पवारांनी शरद पवारांवर थेट टीका केली. आता शरद पवारांनी अजित पवारांवर पहिल्यांदाच थेट वार केलाय आणि तो वार आहे दादांच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नावर.
Sharad Pawar Vs Ajit Pawar : पक्षात फूट पडल्यानंतरच्या पहिल्या मेळाव्यात अजित पवारांनी शरद पवारांवर जहरी टीका केली होती. विशेषत: वयाच्या मुद्द्यावरुन दादांनी शरद पवारांना टार्गेट केलं होतं.. अजित पवारांच्या व्यक्तिगत आरोपांनंतरही पवारांनी प्रतिक्रिया दिली नव्हती. अजित पवार गटाच्या आरोपांना शरद पवार फारसं प्रत्युत्तर देत नव्हते. आता मात्र पहिल्यांदाच शरद पवारांनी अजित पवारांना आपल्या खास शैलीत टोला लगावला आहे. विशेष म्हणजे दादांचं स्वप्न असलेल्या मुख्यमंत्रीपदावरुनच पवारांनी निशाणा साधला आहे.
अजित पवार गटानं शरद पवारांवर वयाच्या मुद्द्यावरुन टीका केली. पवारांनी प्रत्युत्तर दिलं नाही.. निवडणूक आयोगासमोर पवारांना हुकूमशाह म्हटलं. तरीही पवार शांत राहिले. मात्र, पहिल्यांदाच शरद पवारांनी अजित पवारांवर बोचरी टीका केलीय.. आणि वार केलाय तो अजित पवारांच्या स्वप्नावर अजित पवार मुख्यमंत्री होणं, हे स्वप्नच राहणार, असं मोठं विधान शरद पवारांनी केले आहे.
सुप्रिया सुळेंची इच्छा आम्ही पूर्ण करणार, असं विधान भुजबळांनी केले आहे. अजित पवार मुख्यमंत्री झाले तर त्यांचं अभिनंदन करायला पहिला हार घेऊन मी जाईन असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण करणं आमचं काम आहे असं म्हणत भुजबळांनी टोला लगावलाय. तर, सुप्रिया सुळेंचं हे स्वप्नच राहणार, असा टोला शरद पवारांनी लगावला.
अजितदादा मुख्यमंत्री झाले तर त्यांना पहिला हार मी घालणार - सुप्रिया सुळे
अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालीय. अजितदादा मुख्यमंत्री झाले तर त्यांना पहिला हार मी घालणार अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिलीय. तर अजित पवारांना कमी लेखत असल्याची टीका बावनकुळेंनी सुळेंवर केलीय. भुजबळांनीही ताईंचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार भुजबळांनी व्यक्त केलाय. तर हे स्वप्न असल्याचा टोला पवारांनी लगावलाय.
अजित पवारांचा दोन्ही वेळेचा शपथविधी हा शरद पवारांना अंधारात ठेवून घेतला
अजित पवारांचा दोन्ही वेळेचा शपथविधी हा शरद पवारांना अंधारात ठेवून घेतल्याची कबुली भुजबळांनी दिली असा दावा सुप्रिया सुळेंनी केलाय...तसंच भाजपसोबत जाण्याचा आग्रह केल्यामुळेच पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचा दावाही सुळेंनी केलाय. तर सुळेंना अध्यक्ष करून अजित पवार गटाची पुढची तयारी भाजपसोबत जाण्याचीच होती असं पवारांनी नमूद केलंय. छगन भुजबळांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर टीका केलीय. काँग्रेस पक्षात जाण्याआधीच सेनेचा मी नेता होतो, मला कोणी मोठे केले म्हणत असेल तर चुकीचं आहे, असं भुजबळांनी म्हटलंय. भुजबळ राष्ट्रवादीच्या तिकिटीवर निवडून आले आणि भाजपत गेले, असं शरद पवारांनी आजच्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.