Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळत आहे. राजकारणात एकदा म्होरक्या बॅकफूटला गेला की सहकारीही टीम बदलायच्या तयारीत असतात. तशीच अवस्था अजित पवारांची झाली आहे. कारण पिंपरी-चिंचवडमधील तब्बल 14 नगरसेवर अजित पवारांचा गट सोडून मोठ्या पवारांकडे जाण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बारामती नंतर पिंपरी चिंचवड हा अजित पवार यांचा बालेकिल्ला. पिंपरी-चिंचवड महापालिकेवर तब्बल 15 वर्ष राष्ट्रवादीने सत्ता गाजवली. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर 36 पैकी एक नगरसेवक शरद पवारांकडे राहिला. उर्वरित 35 नगरसेवकांनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं.  मात्र लोकसभा निकालानंतर आता अजित पवारांना इथं धक्का बसण्याची शक्यताय. अजित पवारांचे कट्टर समर्थक अजित गव्हाणेंसह चौदा नगरसेवकांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं खळबळ उडालीय. नगरसेवकांच्या भेटीनंतर मोठ्या पवारांनीही प्रवेशासाठी पक्षाचे दरवाजे उघडे असल्याचे स्पष्ट संकेत दिलेत.


मोठ्या पवारांची भेट घेतलेल्या चौदा नगरसेवकांसोबतच अजित पवार गटाचे सर्वच नगरसेवक शरद पवार गटात येण्यास इच्छुक असल्याचा दावा शरद पवार गटाच्या तुषार कामठे यांनी केलाय.  पिंपरी-चिंचवडमधील या राजकीय घडामोडींमागे माजी आमदार विलास लांडे यांची व्युहरचना असल्याची चर्चा आहे.. कारण शरद पवारांच्या भेटीला अजित गव्हाणेंसोबत विलास लांडेंचा मुलगाही होती.. त्यामुळे या सर्व राजकीय खेळीमागे विलास लांडे असल्याची चर्चा सुरू झालीय. मात्र लांडेंनी यावर प्रतिक्रिया देणं टाळलंय. लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभेच्या तोंडावर अजित पवारांना राज्यभरातून अनेक धक्के बसण्याची शक्यता आहे.. त्यात अजितदादांचा पुणे जिल्हाही अपवाद नाहीय.


 यापूर्वी देखील पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. शहराध्यक्ष अजित गव्हाणे, राहुल भोसले, समीर मासुळकर, पंकज भालेकर यांच्यासह काही माजी नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या भेटीचं वृत्त खरं असल्याचं पवारांनी म्हटलं होते. महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र राहावं असं त्यांना वाटतं. आम्ही त्यांचं स्वागत करू असं पवारांनी म्हटलंय .भेट घेणाऱ्यांमध्ये माझी आमदार विलास लांडे यांचा मुलगा विक्रांत लांडेंचं ही नाव असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा सुरू होती.