Hug Day : व्हॅलेंटाइन डेच्या (Valentine's Day) दिवशी 14 फेब्रुवारीला गाईला मिठी मारून गो-मिठी दिन (Cow hug Day) साजरा करण्याचे आदेश केंद्रीय पशुकल्याण मंडळाने (AWBI) दिल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. देशभरातून या निर्णयावर टीका करण्यात येत होती. अखेर शुक्रवारी केंद्राने आदेश देत हा निर्णय मागे घेतला आहे. या निर्णयावर चहुबाजूंनी टीका झाल्याने पशुकल्याण मंडळाने हे पाऊल उचलले आणि गो-मिठी दिन साजरा करण्याचा निर्णय रद्द केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हॅलेंटाइन डेला केंद्रीय पशुकल्याण मंडळाने गोप्रेमींनी गाईला मिठी मारण्याचे आवाहन केल्यानंतर त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या होत्या. समाजमाध्यमांवरही या निर्देशाची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवण्यात येत होती. त्यामुळे मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या पशुसंवर्धन पशुकल्याण  मंडळाने (AWBI) याबाबत आदेश जारी केला होता. राज्यातही या निर्णयावरुन जोरदार टीका करण्यात येत होती. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही या निर्णयावरुन जोरदार टीका केली आहे.


"दिल्लीत बसणारे अधिकारी काय लिहितात, त्यांचे त्यांना माहीत नाही. त्यांना म्हणावे, ये एकदा गाईसमोर तुझा हग डे कसा होतोय बघ. फ्लॅट संस्कृतीमध्ये वाढलेल्यांना गाव, गाय, रेडकू, म्हैस, वासरु याबद्दल काही माहितीये का आणि निघाले काऊ हग डे करायला," अशा शब्दात अजित पवार यांनी या निर्णयाची खिल्ली उडवली आहे.


रेडकू, म्हैस, वासरु याबद्दल काही माहितीये का?


"केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने काऊ हग डे हा एक नवीन दिवस सुरु केला. मी अनेक वर्षांपासून शेती करत होतो. गाईला गोंजारलं जाते, हे मला माहिती होते. पण गाईला मिठी मारणं हे मी पहिल्यांदाच ऐकतोय. गाय मारकी असली तर शिंगावर घेतल्याशिवाय गप बसायची नाही. दिल्लीत बसणारे अधिकारी काय लिहितात, त्यांचं त्यांना माहीत नाही. त्यांना म्हणावं, ये एकदा गाईसमोर तुझा हग डे कसा होतोय बघ. फ्लॅट संस्कृतीमध्ये वाढलेल्यांना गाव, गाय, रेडकू, म्हैस, वासरु याबद्दल काही माहितीये का? काऊ हग डे करायला निघाले, हे सर्व थोतांड आहे. ज्यांनी हा जीआर काढला त्यांचा शेणाशी, मातीशी, शेतीशी काही संबंध नाही. यांना मेढंरं म्हणजे काय? विचारलं तर सांगता यायचं नाही," अशी टीका अजित पवार यांनी केली.


दरम्यान, पशुकल्याण मंडळाने 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे ऐवजी काऊ हग डे म्हणून साजरा करण्याचे आवाहन केल्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड नाराजी दिसून आली. या निर्णयानंतर सोशल मीडियावर शेकडो मीम्स आणि जोक्स बनवण्यात आले. दुसरीकडे गायीला मिठी मारण्याचे फायदे असल्याचे पशुकल्याण मंडळाने म्हटले होते. गायीला मिठी मारल्याने भावनिक समृद्धी येते आणि वैयक्तिक आणि सामूहिक आनंद वाढतो, असे उदाहरण पशुकल्याण मंडळाने दिले होते.