पुणे : राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपवर (BJP) जोरदार टीका केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आपण पुन्हा कोल्हापूरला जाणार असल्याचे जाहीर केले होते. तेही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत पुण्यातील (Pune) कार्यक्रमात. हाच धागा पकडत अजित पवार यांनी फडणवीस याणि चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल चढवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांना चिमटे काढले. मी परत येईन असे एकजण म्हणतो. तर मी परत जाईन, असे दुसरा सांगतो, अशा शब्दांत त्यांनी भाजप नेत्यांवर टोलेबाजी केली. दरम्यान,  विविध खासगी बँकांनी सामाजिक बांधिलकी राखत त्यांच्या ‘सीएसआर’ फंडातून ‘कोविड-१९’च्या लढाईसाठी केलेल्या कामांचे उद्घाटन तसेच विविध उपकरणांचे लोकार्पण अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते.


भाजपचे सरकार नाही त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. सुरुवातीला देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन म्हणत होते. आता दुसरे म्हणतात मी परत जाईन. परत जाईन म्हणायला त्यांना कोणी पुणेकरांनी बोलवालेले नव्हते. आमच्या भगिनी मेधा कुलकर्णी, कार्यकर्ते उगाच नाराज झाले, असे अजित पवार यांनी म्हटले. 


त्याचवेळी अजित पवार म्हणाले, निवडणुकीत कोणी कुठे उभे राहावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण एक वर्ष होण्याआधीच परत जाण्याची भाषा करु लागले. लोकांनी पाच वर्षासाठी निवडून दिले आहे. कोथरुडची कामे व्हावीत अशी अपेक्षा आहे. उद्या लोक कामे घेऊन गेले तर मी परत जाणार आहे सांगतील. मग आले कशाला? कोल्हापुरलाच थांबायचे होत ना, असा टोला लगावला.


शेतकरी आंदोलनावर भाजपवर टीका


आम्ही शेतकऱ्यांना त्रास दिलेला नाही. उलट भाजपने शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा विचार करावा. त्यांनी त्यांचे काम करावे आणि आम्ही आमचे काम करत आहोत. जर यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतले आहेत, तर शेतकरी रस्त्यावर का आला आहे. इतक्या थंडीत आंदोलन का सुरु आहे याचे आत्मपरीक्षण करावे. इथे बैलगाडीत बसून फोटो काढले. दिल्लीत महाराष्ट्रातूनही शेतकरी गेले आहेत, असे अजित पवार यांनी सांगितले.