राऊत बोलल्याने अंगाला भोकं पडत नाहीत; अजित पवारांचे सडेतोड उत्तर
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात पुन्हा एकदा कलगीतुरा रंगला आहे.राऊतांनी पातळी सोडून टीका केल्यानंतर अजित पवारांनी देखील जसास तसे उत्तर दिले आहे.
Ajit Pawar On Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात पुन्हा एकदा जुंपली आहे. अजित पवारांना प्रत्युत्तर देताना राऊत यांची जीभ पुन्हा घसरली आहे. नेत्यांनी तारतम्य बाळगावं असं विरोधी पक्षनेते अजित पवारांनी राऊतांना सुनावल आहे. त्यावर पलटवार करताना राऊतांनी पातळी सोडून टीका केली. मात्र, राऊत बोलल्याने अंगाला भोकं पडत नाहीत असं प्रत्युत्तर अजित पवारांनी दिल आहे.
सावरकरही कोर्टात थुंकले होते; संजय राऊतांचा दावा
भर पत्रकार परिषदेत थुंकण्याच्या कृतीनंतर आता राऊतांनी स्वातंत्र्यवीर सावरकरही कोर्टात थुंकले होते असा नवाच दावा केला आहे. गद्दारांवर थुंकणं ही हिंदू संस्कृती असल्याचा शोधही संजय राऊत यांनी लावला आहे.
संजय राऊतांच्या वादग्रस्त कृतीनंतर शिंदे गट आक्रमक
संजय राऊतांच्या वादग्रस्त कृतीनंतर आता शिंदे गट आक्रमक झाला. राऊतांविरोधात मुंबईत शिंदे गटाने आंदोलन करत घोषणाबाजी केली. तर, ठाण्यात शिवसेना महिला आघाडी आणि युवासेनेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारत तसंच लाथा मारत आपला संताप व्यक्त केला. संजय राऊतांची खासदारकी रद्द करण्याची मागणीही शिंदे गटाने केली आहे.
अजित पवार राऊतांवर संतापले
अजित पवार विरुद्ध संजय राऊत. महाविकास आघाडीतले दोन बडे नेते. एक घाव दोन तुकडे करणारी रोखठोक भूमिका ही अजित पवारांची ओळख. तर सामनामधील रोखठोक लिखाण ही संजय राऊतांची जमेची बाजू. मात्र याच रोखठोकवरून महाविकास आघाडीच्या या नेत्यांमध्ये वादाचा सामना रंगला आहे. अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर राऊतांनीही तसे संकेत दिले होते. राऊतांच्या या उलटसुलट दाव्यांमुळं अजित पवार भलतेच संतापले होते. आमचं वकीलपत्र घेऊ नका, अशा शब्दांत अजितदादांनी सुनावल होते. तर, मी मविआचा चौकीदार आहे, असा दावा राऊतांनी केला होता. अजित पवार आणि सजंय राऊत यांच्यात वारंवार खटके उडत आहेत.