Maharashtra Assembly Election: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने बटेंगे तो कटेंगे अशी  घोषणा दिली आहे. या घोषणेवरुन राज्यात मोठा गदारोळ उठला होता. तर, भाजपचा मित्रपक्ष आणि महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने मात्र, भाजपच्या या भूमिकेचे समर्थन केलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घोषणेला विरोध केला आहे. मात्र, आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना या घोषणेचा अर्थ लक्षात आला नाही, असा टोला लगावला आहे. झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बटेंगे तो कटेंगे या घोषणेचा अर्थ अजित पवारांच्या लक्षात आला नाही. जनभावना अजितदादांच्या लक्षात आली नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.  देशाचा इतिहास काय सांगतो. या देशात जेव्हा जेव्हा आमचा समाज जातींमध्ये वाटला गेला, प्रांतात वाटला गेला. किंवा विविध कारणांनी वाटला गेला तेव्हा आम्ही गुलामीत गेलो. देशही कटला, समाजही कटला आणि व्यक्तीही कटला. त्यामुळं ते सातत्याने सांगतात की हे जे राजकारण चाललं आहे.  जातीजातींमध्ये विभाजन करण्याचे, यापासून सावध राहा. एकत्र राहिलो तर शक्ती आहे, वाटलो गेलो तर संपावं लागेल. याला चांगल्या शब्दांत मोदींनी सांगितलं आहे की एक है तो सेफ है ,' असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 


'बटेंगे तो कटेंगे याचा अर्थ काय हे मोदींनी देखील सांगितले आहे. आज 350 जाती मिळून ओबीसी घटक आहे. ओबीसी आहेत म्हणून एक फोर्स आहे. तो ओबीसी जर 350 जातींमध्ये विखुरला गेला तर फोर्स राहणार नाही. आदिवासी एसटी म्हणून फोर्स आहे. पण 54 जाती त्यात आहेत. या जाती वेगळ्या झाल्या तर काय होईल?,' असा सवालही फडणवीसांनी केला आहे.  


दरम्यान, बटेंगे तो कटेंगे  या घोषणेवरुन भाजपमध्येही दोन मतप्रवाह असल्याचे दिसून येत आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे व भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनीही या घोषणांची गरज नाही असं म्हटलं होत. त्यावरही देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं आहे. 'पक्षातील कोणाला जर समजलं नसेल तर मी ही भूमिका समजावून सांगेन. बटेंगे ते कटेंगे, एक है तो सेफ हे, ही पक्षाची भूमिका आहे,' असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.