Ajit Pawar : अर्थखात्याची सूत्रं हाती आल्यावर अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांवर निधीवर्षाव केला आहे. त्यांनी या आमदारांच्या मतदारसंघात कामासाठी 25 कोटी किंवा त्याहून अधिक निधी मंजूर केला आहे. तर, पुरवणी मागण्यांमध्ये विकासकामांसाठी 1500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.


शिंदे गटाच्या आमदारांनाही केले खूश 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीसह शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघातल्या विकासकामांसाठीही निधी मंजूर करण्यात आला आहे. अजित पवारांच्या या निधीवर्षावावर शरद पवार गट आणि ठाकरे गटाने टीका केली. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांवर निधीचा वर्षाव केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी फेटाळला. सर्वच पक्षांच्या आमदारांना निधी मिळाल्याचं फडणवीस म्हणाले. 


एकच वादा... अर्थमंत्री अजितदादा...


एकच वादा... अर्थमंत्री अजितदादा... शिवसेनेचा विरोध असतानाही उपमुख्यमंत्री अजित पवार हेच पुन्हा अर्थमंत्री झालेत. 2 जुलै रोजी राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांच्या शपथविधीनंतर तब्बल 12 दिवसांनी खातेवाटप जाहीर झाले. खरं तर अजितदादांना अर्थमंत्रीपद देऊ नये, यासाठी सत्ताधारी शिवसेनेनं सगळा जोर लावला. मात्र तरीही तिजोरीच्या चाव्या अजित पवारांकडेच सोपवण्यात आल्यात. 


अजित पवार अर्थ खात्यावर ठाम होते


अर्थमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळेल, असा 'वादा' बंडाआधीच करण्यात आला होता. त्यामुळं अजित पवार अर्थ खात्यावर ठाम होते. तर मुख्यमंत्री शिंदे आणि शिवसेनेचा अर्थ खातं देण्यास विरोध होता. खातेवाटपाचा हा तिढा सोडवण्यासाठी अजित पवारांनी दिल्लीला धाव घेतली. अखेर दिल्लीतून भाजप नेतृत्वाचा आदेश आला आणि अजित पवारांच्या अर्थमंत्रीपदावर शिक्कामोर्तब झालं, अशी माहिती सूत्रांनी दिली.  महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री असताना अजित पवार निधी देत नव्हते.. शिवसेनेच्या आमदारांनी बंड केलं, तेव्हा हे कारण त्यांनी पुढं केलं होतं. मात्र पूर्वी आक्षेप असला तरी आता काहीच अडचण येणार नाही, असा दावा भाजपकडून करण्यात आला होता. 


भाजपनं शिंदेंच्या विसर्जनाची तयारी सुरू केलीय


शिवसेना शिंदे गटानं कितीही दावे केले तरी मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही. उलट भाजपनं शिंदेंच्या विसर्जनाची तयारी सुरू केलीय, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांनी केलाय. शिंदे गटातील आमदार आमच्या संपर्कात आहेत. मात्र त्यांच्यासाठी दरवाजे बंद असल्याचंही त्यांनी सांगितलं. पिंपरी मध्ये शिवसेनेच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबिराला राऊत आणि सचिन अहिर यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.