पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबामध्ये आता स्नेहभोजनाचा कार्यक्रम रंगणार आहे. त्यामुळे अजित पवारांचे कुटुंबिय श्रीनिवास पवार यांच्या काटेवाडीतल्या घरी जाणार आहेत. तिथे हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम होईल, असं कळतंय. शरद पवारांनी पार्थ पवार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर काहीशी कटुता आली असल्याचं समोर येत आहे. शरद पवारांच्या त्या वक्तव्यामुळे पार्थ पवार आणि अजित पवार नाराज असल्याचं बोललं जातंय. त्या वादाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार उद्या बारामतीमध्ये असणार आहेत. आत्तापर्यंत जेव्हा पवार कुटुंबामध्ये काही राजकीय वाद निर्माण झाले तेव्हा श्रीनिवास पवार यांची भूमिका महत्त्वाची राहिली. उद्याही स्वातंत्र्यदिनानिमित्त श्रीनिवास पवार यांनी त्यांच्या घरी कौटुंबिक भोजन ठेवलं आहे. त्यामुळे अजित पवार कुटुंबिय बारामतीमध्ये जात आहेत. 


पार्थ पवार आणि त्यांच्या आई या आज रात्रीच बारामतीमध्ये जातील आणि अजित पवार पुण्यातलं झेंडावंदन करुन बारामतीला जातील. त्यामुळे कौटुंबिक वादावर या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे. 


दरम्यान पार्थ पवार हे आज पुण्यात अभिजीत पवार यांच्याही भेटीला गेले. पुढचा निर्णय घेण्याआधी पार्थ आपले काका आणि आत्यांशी चर्चा करत आहेत. 


पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत, त्यांच्या मागणीला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, असं शरद पवार म्हणाले होते. शरद पवार यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पार्थ पवार कमालीचे दुखावले गेले. नाराज झालेले पार्थ पवार हे मोठा निर्णय घ्यायच्या तयारीत असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. मोठा निर्णय घेण्याआधी पार्थ पवार कुटुंबातल्या व्यक्तींशी चर्चा करत असल्याचंही सांगितलं जात आहे. 


दरम्यान पार्थ पवार यांनी काल शरद पवारांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक बंगल्यावर जाऊन सुप्रिया सुळेंची भेट घेतली. जवळपास सव्वादोन तास पार्थ पवार सिल्व्हर ओक बंगल्यावर होते. कालच सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयात जाऊन अजित पवार यांचीही भेट घेतली. 


बुधवारी शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबाबत वक्तव्य केल्यानंतर काहीच वेळात अजित पवार सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या मुंबईतल्या निवासस्थानी पोहोचले. तिकडे शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांची बैठक झाली.


तर आज मुंबईच्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये अजित पवार समर्थक नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. सुनिल तटकरे, धनंजय मुंडे आणि आदिती तटकरे हे नेते शरद पवारांच्या भेटीला गेले होते.