Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत महायुतीने भरघोस यश मिळवल्यानंतरही शपथविधी 5 तारखेपर्यंत रखडला आहे. अशातच एकीकडे एकनाथ शिंदे नाराज असल्याची देखील सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. तर शपथविधीच्या विलंबामुळे अजित पवार अस्वस्थ असल्याची चर्चा देखील  सुरु आहे. भाजपचा आणि राष्ट्रवादीचा शपथविधी उरकून घ्यावा अशी भूमिका राष्ट्रवादीने मांडल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महायुतीने राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मोठं बहूमत मिळवल्यानंतरही अद्याप सरकार स्थापन झालेलं नाहीये. अनेक राजकीय नेत्यांनी भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र, भाजपचा मुख्यमंत्री जरी होणार असला तरी अद्याप नाव जाहीर झालेलं नाहीय. शिवसेनेचे नेते अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्रीपदावर दावा सांगत आहेत. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी केलीय. तर शिवसेना गृहखात्यावर अडून बसल्याचीही माहीती सूत्रांकडून मिळत आहे. या सगळ्यामुळे शपथविधीला विलंब झाला असल्याच देखील म्हटलं जात आहे. याच सरकारस्थापनेतील विलंबामुळे अजित पवार आणि त्यांच्या पक्षातील नेते प्रचंड अस्वस्थ असल्याची चर्चा सुरू आहे. 


शपथविधीला विलंब झाल्यामुळे अजित पवार अस्वस्थ? 


राज्यात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. संपू्र्ण राज्याचं लक्ष याकडे लागलं आहे. अशातच आता एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी अस्वस्थ असल्याचं म्हटलं जात आहे. कारण विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 10 दिवस झाले आहेत. यामध्ये भाजप, राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटाला मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या आहेत. तरीही सरकार स्थापन होत नसल्याने राष्ट्रवादीत अस्वस्थता दिसून येत आहे. महायुतीकडे बहुमत असल्यानं किमान दोन पक्षांसह मंत्रिमंडळाचा शपथविधी उरकून घ्यावा या मागणीसाठी अजित पवारांनी दिल्ली गाठलीये. 


राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चांगल्या जागा मिळाल्या. उपमुख्यमंत्रीपदासोबतच चांगली खाती पदरात पाडून घेण्यासाठी राष्ट्रवादीची तयारी सुरू आहे. अजित पवारांची दिल्लीवारी अस्वस्थेतून असल्याचं सांगण्यात येत आहे. दिल्लीवारीनंतर तरी त्यांची अस्वस्थता कमी होणार का याची उत्सुकता आहे.