बारामती : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावाचा फटका बारामतीलाही बसला आहे. बारामती तालुक्यात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी अजित पवार यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. बारामती तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासोबतच कोरोना चाचणी, रुग्णवाहिका व्यवस्थापन, रुग्णालयातील बेड व्यवस्थापन आणि डॉक्टर याबाबतचे  नियोजन संगणकीय प्रणालीव्दारे करा. तसंच या कामाच्या अंमलबजावणीत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बैठकीमध्ये अजित पवारांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व सध्या उपचार घेत असलेल्या कोरोना रूग्णांची माहिती वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे, असं अजित पवार म्हणाले. 


कोरोनाच्या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे. नवीन रुग्णांची भर पडणार नाही, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे तसेच संस्थात्मक क्वारंटाईन ठिकाणी आवश्यक त्या सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात.  बारामती शहरातील खासगी रूग्णालय कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी तातडीने ताब्यात घेण्याच्या बाबतही त्यांनी सूचना दिल्या. आरोग्य विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समन्वय साधून काम करावे, असेही  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.