अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यानंतर अजित पवार यांचा थेट इशारा
राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं, यानंतर बाह्मण समाजाने खासदार सुप्रिया सुळे यांना घेरलं होतं.
मुंबई : राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं, यानंतर बाह्मण समाजाने खासदार सुप्रिया सुळे यांना घेरलं होतं. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या स्टाईलमध्ये थेट इशारा दिला आहे. अजित पवार यांनी या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया माध्यमांकडे व्यक्त केली आहे. या वक्तव्याविषयी अमोल मिटकरी यांनी माफी मागावी अशी मागणी, ब्राह्मण समाजाने केली होती.
यानंतर अजित पवार यांनी या वक्तव्यावर सर्वपक्षीय नेत्यांनी कोणतीही वक्तव्य करताना, कोणत्याही समाजाची भावना दुखावणार नाही, कोणत्या घटकांचा अवमान होणार नाही, तसंच नाराजी ओढवणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असं आपलं स्पष्ट मत असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
अमोल मिटकरी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पुण्यातील बाह्मण समाज प्रचंड आक्रमक झाला होता. अमोल मिटकरी यांनी माफी मागावी अशी मागणी काही ब्राह्मण संघटनांनी लावून धरल्याने राष्ट्रवादी अडचणीत आल्याचं दिसून आलं, याविषयी जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांनी ब्राह्मण समाजातील काही व्यक्ती आपल्यामागे सावलीसारख्या उभ्या असल्याचं सांगितलं.
अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यामुळे एवढा राडा झाला असला, तरी अमोल मिटकरी यांनी आपण केलेल्या वक्तव्यात ब्राह्मण समाजाचा उच्चार नसल्याचं म्हटलं आहे.