डोंबिवली : राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या नरेंद्र पाटील यांना माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी सल्ला दिलाय. राज्याच्या मुख्यमंत्र्यांसमोर झुकून दबून राहण्याची अजिबात गरज नाही, असा सल्ला दिलाय. माथाडी कामगार नेते गुलाबराव जगताप यांच्या एकसष्टी सोहळ्यासाठी अजित पवार डोंबिवली येथे आले होते. त्यावेळी ते बोलत होते. नरेंद्र पाटील यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी झालेली नियुक्ती ही काही भाजपची मेहेरबानी नाही तर त्यांचा तो हक्क आहे. याचे भान पाटील यांनी ठेवले पाहिजे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्र्यांपुढे झुकून दबून राहण्याची अजिबात गरज नाही, कारण माथाडींचा नेता हा स्वयंभू असला पाहिजे. माझ्यासह माथाडी कामगरांना ही गोष्ट अजिबात पटणार नाही, असे अजित पवार म्हणालेत. त्याचवेळी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सडकून टीका केली. 


निवडणुकीपूर्वी भाजपने अनेक आश्वासने दिली होती. पंतप्रधानांनी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करण्याचे जाहीर केले होते. मुख्यमंत्र्यांनी तर कल्याण - डोंबिवलीसाठी साडेसहा हजार कोटींचे पॅकेजचे आश्वासन दिले. मात्र साडेसहा हजार कोटींपैकी साडेसहा रुपये तरी आले का हो, असा सवाल उपस्थित केला. अच्छे दिनप्रमाणे हा ही एक जुमला असल्याचे ते म्हणालेत. तीन राज्यातील भाजपच्या झालेल्या पिछेहाटवरून त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंधेरा हटेगा, सूरज निकलेगा या कवितेचा संदर्भ देत देशाची परिस्थिती बदलत असल्याचे  असल्याचेही सांगितले.


दरम्यान, वाहतूक कोंडी असल्याने या कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेते मंडळींनी लोकलद्वारे मुंबईहून डोंबिवलीपर्यंतचा प्रवास केला.