`निलेश जाऊ शकत नाही, त्याला जायचं असेल तर...`; लंकेच्या पक्षांतरासंदर्भात अजित पवार स्पष्टच बोलले
Ajit Pawar On Nilesh Lanke Changing Party: मागील काही दिवसांपासून निलेश लंके अजित पवार गट सोडणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. अशातच आता अजित पवारांनी यासंदर्भात आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Ajit Pawar On Nilesh Lanke Changing Party: अजित पवार गटातील नेते आणि विद्यमान आमदार निलेश लंके हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. आज म्हणजेच 14 मार्च रोजी दुपारी शरद पवारांच्या उपस्थित लंके पक्षप्रवेश करतील असं सांगितलं जात आहे. लंके यांचा हा निर्णय अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. असं असतानाच आता थेट अजित पवारांनीच निलेश लंकेच्या पक्षांतरासंदर्भात भाष्य केलं आहे.
अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. आज अजित पवारांच्या 7 सभा बारामती मदतारसंघात होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळेस निलेश लंके शरद पवार गटात जाणार असल्याचा संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना निलेश लंके यांना जायचं असेल तर आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल, असं अजित पवार म्हणाले. "निलेश लंके जाऊ शकत नाही. त्याला जायचं झालं तर त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल. राजीनामा देऊन कोणाला कुठेही जाता येतं," असं अजित पवार म्हणाले. पुढे बोलताना अजित पवार यांनी, "वास्तविक निलेशला पक्षात मी घेतलं. निलेशला मनापासून आधार मी दिला. कालच माझ्याकडे तो आला होता. त्याला मी काही गोष्टी नीट समजावून सांगितल्या आहेत. परंतू काही लोकांनी त्याच्या डोक्यात हवा घातलेली आहे की तू खासदार होशील. वास्तविक तसं नाहीये," असंही म्हटलं.
निलेश लंकेंच्या पक्षांतरासंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी अहमदनगरच्या पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या पक्षप्रवेशाबाबत भाष्य केलं. याआधी खासदार अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना महाविकास आघाडीत येऊन तुतारी घेऊन लोकसभा निवडणूक लढण्याच निमंत्रण दिल होतं. त्यानंतर निलेश लंके शरद पवार गटात पक्ष प्रवेश करणार अशी चर्चा सुरु झाली. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी पुण्यातील पत्रकार परिषेदत शरद पवारांनीही प्रतिक्रिया नोंदवली होती.
नक्की वाचा >> ..मग श्रीकांत शिंदेंचे योगदान काय असं जनतेनं विचारायचं का? अजित पवार गटाचा CM शिंदेंना सवाल
"चर्चेला काही अर्थ नाही. एकदम अशी चर्चा का झाली. असे अनेक लोक आहेत. ही चर्चा मी तुमच्याकडून ऐकत आहे. किती संपर्कात आहे याबद्दल माहिती नाही कारण आम्ही त्या उद्योगात नाही. अनेक लोक असे आहेत की, ज्यांना हे योग्य वाटत नाही. त्यांनी आमच्यापासून दूर जाण्याचे निर्णय घेतले आहेत आणि त्यांच्या निर्णयावरुन ते ठाम आहेत. पण ते अस्वस्थ आहेत. कोण येणार आहे त्याची माहिती द्या, माझ्या समोर उभं करा," असं शरद पवार निलेश लंकेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आलं असता म्हणाले होते.