Ajit Pawar Group Questions CM: बारामतीमधून आपण अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार असल्याची घोषणा शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी बुधवारी केली. ही घोषणा करताना शिवतारेंनी, बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार निवडणूक व्हायला नको असं सांगतानाच पवारांना मतदान करु नका असं आवाहन केलं. तसेच अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांचे सामाजिक कार्य काय आहे? असा प्रश्नही विजय शिवतारे यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला आहे. मात्र आता या आरोपावरुन अजित पवार गटाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सवाल केला आहे. सुनेत्रा पवार यांचं समाजिक कार्य काय असं शिवतारे म्हणत असतील तर 2014 मध्ये डॉ. श्रीकांत शिंदेंचे योगदान काय होते? असा प्रश्न जनतेने विचारायला हवा होता. त्यांनी मतदान करताना कल्याणच्या जनतेनं श्रींकांत शिंदेंबद्दल असं म्हटलं तर चालेल का? असा सवाल अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते असलेल्या आनंद परांजपेंनी मुख्यमंत्री शिंदेंना विचारला आहे. त्याचप्रमाणे शिवतारेंनी आपण शिंदेंचे निष्ठावान असल्याचं म्हटल्याने त्यांनी याबद्दलही स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी परांजपेंनी केली आहे.
शिवतारे यांनी बुधवारी आपण 1001% बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर अनेक आरोप शिवतारेंनी यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत केले. याचसंदर्भात बोलताना आनंद पराजपेंनी, "शिवतारेंनी अजित पवारांवर आरोप केले. आमचे श्रद्धास्थान शरद पवार, खासदार सुप्रिया सुळेंवरही अनेक आरोप केले. एका बाजूला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मी सन्मान करतो असं म्हणाऱ्या शिवतारेंनी दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मी निष्ठावान आहे, असे वक्तव्य केले. निष्ठेची व्याख्या काय आहे याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता देण्याची गरज आहे, असेही परांजपे यांनी म्हटलं आहे.
महायुतीमध्ये आमच्याबरोबरच भारतीय जनता पार्टीने अत्यंत संयम आणि मर्यादा बाळगली आहे. मात्र मागील 2 दिवसापासून शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारेकडून वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा अपमान केला जात आहे. ते राष्ट्रवादीच्या शक्तिस्थळावर आघात करत आहेत. हे सारं घडत असतानाच मुख्यमंत्री मात्र मुकदर्शक बनलेले आहेत. या प्रकरणामध्ये शिंदेंकडून शिवतारेंना समज देखील देण्यात आली आहे की नाही याची कल्पना देखील महाराष्ट्राला नसल्याचं परांजपे म्हणालेत.
एकीकडे मुख्यमंत्र्यांचा निष्ठावान म्हणायचं मात्र पुढे लगेच आपण महायुतीतील घटक पक्षांच्या विरोधात निवडणूक लढविणार असल्याचं सांगायचं. ही भूमिका तर्काला धरुन असू शकत नाही. शिवतारेंविरोधात कोणती कारवाई करणार हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले पाहिजे. एकीकडे पवार विरुद्ध पवार लढा मान्य नाही त्याला आमचा विरोध आहे असं म्हणायचं. तर दुसरीकडे सुनेत्रा पवारांचे सामाजिक कार्य काय आहे की ज्यासाठी त्यांना बारामतीच्या लोकांनी मतदान केले पाहिजे? असे प्रश्न विचारायचे. असेच असले तर, डॉ. श्रीकांत शिंदे यांचे योगदान काय? असा प्रश्न 2014 मध्ये कल्याणच्या जनतेने मतदान करताना विचारायला हवा होता का? असा प्रश्न परांजपे यांनी उपस्थित केला आहे.