COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बारामती : राजकारणाच्या मैदानात आपल्या भाषणानं विरोधकांना चारीमुंड्या चीत करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार जेव्हा विटीदांडू खेळण्यात मग्न झाले तेव्हा त्यांना पाहून अनेकांचा आश्चर्य झालं. अजित पवारांचा हा हटके अंदाज साऱ्यांसाठीच आश्चर्याचा सुखद धक्का ठरला. पर्यावरण दिनानिमित्त बारामती इथं एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीनं मातीतल्या खेळांची जत्रा या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 


विटीदांडू, गोट्या, लगोरी, भोवरा, पोत्यातील शर्यत, टायर पळवणं अशा खेळांचा लहानथोरांनी आनंद लुटला. तर महिला जिबल्या, फुगड्या, तळ्यात मळ्यात आणि गजग्यांचा खेळ खेळताना पाहायला मिळाला. यावेळी अभिनेत्री अमृता सुभाषलाही या मैदानी खेळाचा आनंद घेण्याचा मोह आवरला नाही. तिनंही साऱ्यांच्या संगतीने या खेळांचा आनंद लुटला. 


बालपणीचे खेळ खेळण्याची संधी मिळाल्याने इथे अनेक पालक, आजी-आजोबा, नातवंडांना इथं घेऊन आले होते. साऱ्यांनीच बालपणीचे हे मनसोक्त खेळत रविवारची सुट्टी सत्कारणी लावली. आजच्या पीढीला मातीच्या खेळाचं महत्त्व करावं या उद्देशाने मातीतल्या खेळांची जत्रा आयोजित करण्यात आली होती. 


कॉम्प्युटर, मोबाईल, स्मार्ट फोनच्या युगात आजची पीढी मातीच्या खेळांकडे दुर्लक्ष करत असल्याची ओरड ऐकायला मिळते. मात्र मातीच्या खेळांच्या जत्रेचे आयोजन करुन लहानथोरांना त्यात सहभागी करणारा हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद असा म्हणावा लागेल.