मविआच्या मोर्चात पैसे वाटून जमवली गर्दी? अजित पवार म्हणाले, `मी लोकांसोबत...`
Maha Morcha : मविआच्या मोर्चात पैसे वाटप झाल्याचा आरोप भाजपने केलाय. भाजपने पैसे वाटपाचा एक व्हिडिओ ट्विट करत हा आरोप केला आहे.
Maharashtra Politics : मुंबईत शनिवारी महाविकास आघाडी (MVA) आणि समविचारी संघटनांचा महामोर्चा पार पडला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न, भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने केला जाणारा महापुरुषांचा अपमान या मुद्यांवरुन मुंबईत शिंदे - फडणवीस सरकारविरोधात महामोर्चा (Maha Morcha) काढण्यात होता. या मोर्चासाठी जमलेल्या गर्दीवरुनही भाजपकडून टीकाही करण्यात आली. लग्नाच्या वऱ्हाडाला यापेक्षा जास्त गर्दी असते असा टोला भाजपने लगावला होता. तर दुसरीकडे मविआच्या या मोर्चात पैसे वाटप झाल्याचा आरोप भाजपने केलाय. भाजपने पैसे वाटपाचा एक व्हिडिओ ट्विट करत हा आरोप केला आहे.
भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पैसे वाटतानाचा व्हीडिओ ट्विट केलाय. मुंबईतील पत्रकार संघाजवळ असलेल्या काँग्रेस कार्यालयाजवळ मोर्चा सुरू असतानाचं दृश्य या व्हिडीओमध्ये आहे. मविआ मोर्चात थोडीफार लोकं जमली ती सुध्दा अशा पध्दतीनं, असं ट्विट केशव उपाध्येंनी केलंय.
हे ही वाचा >> "यापेक्षा जास्त लग्नातील वऱ्हाड असतं"; भाजपने उडवली महाविकास आघाडीच्या महामोर्चाची खिल्ली
या आरोपानंतर आता विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे. "माझ्या माहितीप्रमाणे अजिबात तसं काही झालेलं नाही. मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मोर्चात होतो. मोर्चा संपल्यानंतरही मी काही वेळ तिथल्या लोकांसोबत बोलत होतो. त्यामुळे अशाप्रकारे काहीही झालेलं नाही. पैसे घेऊन आलेले लोक मला दिसले नाहीत. कारण नसताना बदनामी करण्याची गरज नाही," असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिली आहे.
"आम्ही दोन दिवस आधीच देवगिरी बंगल्यावर पत्रकार परिषद घेत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, भाऊराव पाटील या सर्व महापुरुष, स्त्रियांबद्दल जी बेताल वक्तव्यं केली जात आहेत, त्यासाठी इच्छुक नागरिकांनी मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन केलं होतं. त्याप्रमाणे नागरिक सहभागी झाले होते," असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं.