मुंबई : राज्य सरकारी बॅंक घोटाळ्याप्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर शरद पवार यांनी ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्यात राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक झाले. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचे लक्षात घेऊन पवारांनी आपला निर्णय मागे घेतला. त्यानंतर काही तासातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी त्यांच्या आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिला आणि राष्ट्रवादीत भूकंप झाला. त्यानंतर ही चर्चा राज्यात वाऱ्यासारखी पसरली. आता खुद्द शरद पवार पुण्यात ८ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत, अशी माहिती पुण्यातील नेते अंकुश काकडे यांनी दिली. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंजूर केला आहे. राजीनामा दिल्यानंतर अजित पवार यांनी आपला फोनही बंद ठेवल्याने राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीला अवघा एक महिना बाकी असतानाच अजित पवार यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  त्यांच्या राजीनाम्याचे कारण पुढे आलेले नाही. ते नाराज आहेत का, ते विधानसभा निवडणूक लढविणार नाहीत का, ईडीने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याने अजित पवार अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या मनात काय आहे. रोहित पवार यांना राजकारणात पुढे आणले जात आहे. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात काही वाद आहे का, अशी जोरदार चर्चा झडत आहे. त्यामुळे नक्की काय झाले आणि त्यांनी राजीनामा दिला, हा प्रश्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.