`एकच वादा, अजित दादा..` ऐकल्यावर अजित पवारांना हसू अनावर! हात जोडत म्हणाले, `लोकसभेला हा वादा..`
Ajit Pawar React On Ekach Vada Ajit Dada Slogans: अजित पवार आज बारामतीमध्ये असून वेगवेगळ्या ठिकाणी ते भेटी देणार आहेत. अशाच एका कार्यक्रमामध्ये त्यांनी केलेलं हे विधान सध्या चर्चेत आहे.
Ajit Pawar React On Ekach Vada Ajit Dada Slogans: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या भाषणांबरोबरच खास शैलीमधील टीप्पण्यांसाठी ओळखले जातात. निवडणूक प्रचारादरम्यानची विधानं असो किंवा कार्यकर्त्यांना खडसावणं असो अजित पवारांनी केलेली विधानं कायमच चर्चेत असतात. लोकसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये त्यांनी जाहीर भाषणांमध्ये केलेली विधानं खास करुन बारामतीमध्ये केलेली विधानं चांगलीच चर्चेत ठरली. असं असतानाच आज बारामती दौऱ्यावर असताना अजित पवारांनी केलेलं एक विधान चर्चेत असून त्यांनी केलेल्या हलक्या पुलक्या विधानाच्या माध्यमातून मनातील खदखद अगदी हसत बोलून दाखवली.
अजित पवार आज बारामती दौऱ्यावर
झालं असं की आज उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज बारामतीमधील विविध विकास कामांची पाहणी केली. अजित पवार यांच्या सहयोग निवासस्थानी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आलं आहे. त्यांनी आज सकाळी लोकांच्या तक्रारी ऐकून घेण्याबरोबरच विशेष कार्यकर्त्यांशी संवाद साधला. बारामती तालुक्यातील विविध गावात शेतकरी मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं असून या मेळाव्यांनाही आज ते सायंकाळी उपस्थित राहणार आहेत. तसेच शहरातील शारदा प्रांगणात अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त 65 हजार वृक्षरोपांचे वाटप करण्यात आलं आहे. याच भारदस्त कार्यक्रमांदरम्यान अजित पवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगलाच टोला लगावला.
नक्की घडलं काय?
शारदा प्रांगणात अजित पवार यांच्या 65 वाढदिवसानिमित्त हजार वृक्ष वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी भाषण सुरू असताना काही अति उत्साही कार्यकर्ते त्या ठिकाणी एकच वादा अजितदादा अश घोषणाचा नारा देत कार्यक्रम स्थळी आले. त्यावेळी ही घोषणाबाजी एवढ्या जोरात होत होती की अजित पवारांना आपलं भाषण थांबवावं लागलं. अजित पवारांनी दोनदा या तरुणांना हात दाखवून घोषणाबाजी पुरे झाली असा इशारा केला. त्यानंतरही घोषणाबाजी सुरु होती तर अजित पवारांनी भाषण थांबवलं. घोषणाबाजी संपल्यानंतर अजित पवारांनी, "आरे थांबा जरा! बसा खाली! हा वादा लोकसभेला कुठं गेला होता कुणास ठाऊक," असं म्हटलं आणि ते हसू लागले. अजित पवारांचं हे विधान मंचावरील पदाधिकाऱ्यांबरोबरच सर्वच उपस्थित जोरजोरात हसू लागले.
हात जोडले
हसून झाल्यानंतर अजित पवारांनी हात जोडले. त्यानंतरही घोषणा सुरुच असल्याचं ऐकल्यानंतर अजित पवारांनी, "मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मला जरा बोलू द्या. मला आज खूप कामं आहेत," असं म्हटल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणा थांबवल्या आणि अजित पवारांनी भाषण सुरु केलं.
दीड लाखांहून अधिक मतांनी पराभव
बारामतीमध्ये लोकसभेला अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या पक्षाकडून शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळेंविरुद्ध निवडणूक लढवली होती. दोन्ही बाजूने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात आली होती. सुप्रिया सुळेंनी एक लाख 58 हजारांहून अधिक मतांनी ही निवडणूक जिंकली होती. या निवडणुकीनंतर काही आठवड्यांमध्ये सुनेत्रा पवार यांना राज्यसभेच्या खासदार म्हणून संसदेत गेल्या.