Sindkhedaraja Politics: विरोधी पक्ष नेते अजित पवार सत्तेत जाऊन बसल्याने शिवसेना-भाजप गटातील आमदारांना आता आपलं भविष्य अंधकारमय दिसू लागले याची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे. अजित दादांनी जाता जाता राष्ट्रवादीतील बरेच आमदार आपल्या सोबत नेल्याने शिवसेना आणि भाजपची दमकोंडी होऊ लागली आहे. कारण येत्या निवडणुकांमध्ये हे एकमेकांच्या विरोधात कसे उभे राहणार? हा प्रश्न पुढे येऊन ठेपलाय. आणि असाच एक प्रकार बुलढाणा जिल्ह्यातही झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सिंदखेडराजा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार आता अजित पवारांच्या गटात सामील झाले आहेत. यामुळे मतदार संघातील भाजप आणि शिवसेना नेत्यांची मोठी अडचण झालीय. शिवसेनेचे माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर आणि  पंधरा वर्षांपासून जिल्हा परिषद सदस्य असलेले तसेच भाजपचे प्रदेश प्रवक्ते असलेले विनोद वाघ यांचा हिरमोड झालाय. नेमकं करावं तर काय करावं आणि सांगाव तर कुणाला सांगावं...? असं त्यांच्याबाबतीत घडतंय. 


2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे शिवसेनेचे डॉक्टर शशिकांत खेडेकर यांना मात देत पुन्हा एकदा आमदार झाले. मात्र येत्या निवडणुकीसाठी मी पुन्हा एकदा लढीन अशी भूमिका ठेवत डॉ शशिकांत खेडेकरांनी जोरदार तयारी केली होती. पण आता विरोधीच मित्र गटात आल्याने खेडेकरांनी काय करावं अशी चर्चा मतदारसंघ सोडून जिल्ह्यात देखील होऊ लागली आहे.


तर दुसरीकडे पंधरा वर्षांपासून जिल्हा परिषद सदस्य असलेले तसेच भाजपचे प्रदेश प्रवक्ते म्हणून काम पाहणारे विनोद वाघ आमदारकीसाठी तयारी करुन बसले होते. मतदारसंघात तोरणदारी आणि मरणदारी फिरता फिरता विनोद वाघ यांना मैदान जणू काही आपलंच आहे असा विश्वास वाटत होता. मात्र शिंगणेंच्या येण्याने त्यांची दमकोंडी झाल्याची वार्ता जिल्ह्यात ऐकायला मिळतेय.


सर्वात मोठी अडचण कार्यकर्त्यांची


नेते तर ठीक आहे आपापल्या ठिकाणी जीवाचं रान करुन नेत्याला निवडून आणणाऱ्या कार्यकर्त्यांचं काय? असाही प्रश्न उपस्थित होतोय. या आपल्या भाऊ आणि दादांसोबत फिरणारे कट्टर कार्यकर्तेही राष्ट्रवादी आपल्या गटात आल्याने प्रचंड अडचणीत आले आहेत हे मात्र तितकंच खरं...!