Maharashtra CM : अजित पवार मुख्यमंत्री होणार? शरद पवार यांनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
Ajit Pawar : आता अजित पवार यांना पुढचे मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागा असे आवाहन राष्ट्रवादीच्या (NCP) आमदाराने केलं आहे. त्यावर आता शरद पवार यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे
Maharashtra Politics : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी 2019 मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह सकाळी घेतलेल्या शपथविधी आजही जोरदार चर्चा होत असल्याचे पाहायला मिळते. चार वेळा उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागलेल्या अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची (Chief Minister) संधी न मिळाल्याने पक्षासह कार्यकर्त्यांमध्येही नाराजी असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. मात्र, आता अजित पवार यांना पुढचे मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागा असे आवाहन राष्ट्रवादीच्या (NCP) आमदाराने केलं आहे. यावर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
अजित पवार पुढचे मुख्यमंत्री?
अजित पवारांना पुढचे मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागा असं आवाहन आमदार निलेश लंकेंनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले होते. निलेश लंके यांच्या या विधानानं चर्चांना उधाण आले. जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. त्यामुळे पुढचं सरकार महाविकास आघाडीचंच सरकार असणार आहे. राज्याचे पुढचे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचेच असणार आहेत, असं वक्तव्य निलेश लंके यांनी यावेळी केले होते.
"कोणाला काही आवडेल पण तेवढी संख्या असली पाहिजे ना. आमच्याकडे संख्या नाहीये. संख्या असती तर सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही काही निर्णय घेतले असते. आमच्याकडे संख्या नाही त्यामुळे यावर भाष्य करणे योग्या वाटत नाही," असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले.
अजित पवार मुख्यमंत्री झाल्यावर काय करणार?
काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केलं होतं. एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री झाल्यानंतर काय कराल? असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला होता. त्यावेळी अजित पवार यांनी त्यांच्या मिश्किल शैलीत उत्तर दिलं होतं. "आत्याबाईला मिशा असत्या तर काय झालं असतं तसं सांगण्यासारखं आहे. मुख्यमंत्री झाल्यावर दाखवतो काय करायचंय ते", असे अजित पवार म्हणाले होते.
पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यावरुन भाष्य
"मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जास्त महत्त्वाच्या वाटत आहेत. त्यामुळे पुन्हा पुन्हा मुंबईत येत आहे. पण मुंबई राज्याचे काही हित असेल तर त्याला विरोध करण्याचा कारण नाही. मोदी येत आहेत तर देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त करावा," असेही शरद पवार म्हणाले.