Ajit Pawar Visits Sharad Pawar Home: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या असतील हे शुक्रवारी झालेल्या खातेवाटपामध्ये स्पष्ट झालं. अजित पवार यांना अर्थमंत्री पद देण्यात आल्याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर काही तासांमध्येच ते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील निवासस्थान 'सिल्व्हर ओक' (Silver Oak) येथे पोहोचले. राष्ट्रवादीमध्ये बंड केल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार शरद पवारांच्या घरी गेल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं. मात्र आज नाशिकमधील पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांनी ते अचानक 'सिल्व्हर ओक'ला का गेले होते. याबद्दलचा खुलासा केला आहे. 


...म्हणून 'सिल्व्हर ओक'ला गेलो


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास अचानक अजित पवार यांचा ताफा 'सिल्व्हर ओक'च्या प्रवेशद्वारामधून आत शिरल्याची दृष्य प्रसारमाध्यमांनी दाखवली आणि राज्यात पुन्हा काहीतरी राजकीय नाट्य घडणार का याची चर्चा सुरु झाली. मात्र या भेटीबद्दल अजित पवार यांनी खुलासा करता ही भेट शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांची विचारपुस करण्यासाठी होती असं सांगितलं. "काल काकीचं (प्रतिभा पवार यांचं) एक ऑप्रेशन झालं. त्यांच्या हाताला थोडी दुखापत झाली आहे. मला दुपारीच जायचं होतं ऑप्रेशन झाल्या झाल्या. मात्र मला थोडा उशीर झाला कारण खातेवाटप झाहीर झालं. मी नंतर मंत्रालयात होतो, विधानभवनात होतो. नंतर मला विधानसभा अध्यक्षांशी बोलायचं होतं. या सगळ्यांबरोबर चर्चा केली. त्यानंतर मी सुप्रियाला फोन केला. तेव्हा ती मला म्हणाली, "दादा आम्ही आता सिल्व्हर ओकला निघालो आहे. तुझं काम झाल्यानंतर तू 'सिल्व्हर ओक'लाच तुझं काम झाल्यावर ये." मला काकींना भेटायचंच होतं. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी. आपली परंपरा आहे, संस्कृती आहे की आपण परिवाराला महत्त्व देत असतो. त्यामुळे सहाजिकच आमची पवार कुटुंबाची परंपरा आमच्या आजी आजोबांनी आम्हाला शिकवलेली आहे. त्यानंतरच्या काळात आई-वडील, काका-काकींनी शिकवलेली आहे. म्हणून मी काकीला भेटायला गेलो होतो. अर्धा तास मी तिथं होतो. त्यांच्या तब्बेतीची चौकशी केली. खुशाली विचारली. त्यांना अजून 21 दिवस त्याबद्दल काळजी घ्यावी लागणार आहे. माझ्या अंतर्मनाने सांगितलं की आपण तिथे गेलं पाहिजे आणि मी गेलो," असं अजित पवार यांनी सांगितलं.


तिथं पवारसाहेब होते का विचारलं असता म्हणाले...


पवारसाहेब तिथं होते का? असं एका पत्रकाराने विचारलं. त्यावर अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत, "पवार साहेब तिथं होतं. सुप्रिया तिथं होती. काकी तिथं होतं. काय आपल्याला अडचण आहे?" असा प्रतिप्रश्न विचारला असता एकच हशा पत्रकारांमध्ये पिकला. "जर पवारसाहेबांचं घर असेल तर पवारसाहेब असणारच कारण मी रात्री साडेआठला गेलो होतो. काकी तिथं होतं आणि सुप्रियाही तिथे होती," असंही अजित पवार म्हणाले.


माझ्या चेंबरमध्ये शरद पवारांचा फोटो


पवारसाहेबांचा फोटो दिसायचा आता तो दिसत नाही, असं म्हणत अजित पवारांना प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना अजित पवारांनी, "पवारसाहेब श्रद्धास्थान आणि प्रेरणास्थान आहे. आपण काही काळजी करु नका. माझ्या स्वत:च्या चेंबरमध्ये पवारसाहेबांचा फोटो आहे," असं उत्तर दिलं. 


माझी मतं स्पष्ट असतात...


विरोधीपक्ष नेता असताना तुम्ही 'शासन आपल्या दारी' मोहिमेवर टीका केली होती, असं म्हणत अजित पवार यांनी प्रश्न विचारला. यावर अजित पवार यांनी मी कधी टीका केली ते सांगा असं पत्रकारांनाच विचारलं. "माझी मतं स्पष्ट असतात. समोरच्याने चांगलं काम केलं तर मी त्यावर टीका करत नाही. हा माझा स्वभाव आहे. मला ते पटतं ते मी मांडतो," असं अजित पवार म्हणाले.