Pratibha Pawar Crying Photo: राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर बुधवारी मुंबईमध्ये दोन्ही गटांनी शक्तीप्रदर्शन केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या भाषणामध्ये शरद पवारांचं (Sharad Pawar) वय 83 असून त्यांनी आता निवृत्त व्हावं असं मत व्यक्त केलं. शरद पवार यांनी आपल्या भाषणामध्ये भारतीय जनता पार्टीबरोबर जो गेला तो संपला असं म्हणत बंडखोरांना इशारा दिला. शरद पवारांबद्दल अजित पवारांनी केलेल्या विधानावरुन काही वेळातच पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) खोचक शब्दांमध्ये उत्तर दिलं. सध्या सुरु असणाऱ्या या पवार विरुद्ध पवार वादामध्ये एक फोटो सध्या चर्चेत आहेत.


चर्चेतील फोटो कोणता?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार यांचे समर्थक आमदार असलेले आणि अजित पवारांच्या बंडखोरीनंतर विरोधीपक्ष नेते म्हणून चर्चेत असलेल्या जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो काल शरद पवार यांच्या निवासस्थानावरुन बैठकीसाठी निघाले त्यावेळेचा आहे. दुपारी 12 वाजून 1 मिनिटांनी पोस्ट केलेल्या या फोटोवर, "या आसवांना आनंदाश्रुत बदलायचं आहे" असं वाक्य लिहिलेलं आहे. या फोटोला आव्हाड यांनी 'इतकच' अशी एका शब्दाची कॅप्शन दिली आहे.


काय आहे या फोटोमध्ये?


हा फोटो शरद पवार यांच्या कारच्या खिडकीतून काढण्यात आलेला आहे. फोटोमध्ये शरद पवार हात दाखवून कारबाहेर गर्दी केलेल्या कार्यकर्त्यांना अभिवादन करत आहेत. तर शरद पवारांच्या यांच्या बाजूला पत्नी प्रतिभा पवार (Pratibha Pawar) बसल्याचं फोटोत पहायला मिळत आहे. मात्र प्रतिभा पवार यांच्या चेहऱ्यावरील हावभाव हे फारच गंभीर आहेत. त्या रडत असल्याचं आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलेल्या फोटोमधून सांगण्यात आलं आहे. 2019 मध्ये अजित पवारांनी बंड केलं होतं त्यावेळीही प्रतिभाताईंनी त्यांची समजूत घातल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.



सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना सूचक इशारा


शरद पवार यांच्या बैठकीमध्ये बोलताना सुप्रिया सुळे यांनी, "आमच्यावर जी टीका करायची असेल ती करा पण, आमच्या आई-वडिलांबद्दल बोलू नका," असा इशारा अजित पवारांनी दिलेल्या निवृत्तीच्या सल्ल्यावरुन दिला. "उद्योगपती रतन टाटा या वयातही काम करतात. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे वयाच्या 80 व्या वर्षी जाहिरातीत आणि मोठ्या पडद्यावर दिसतात. वडील धाऱ्यांना थांबायला सांगणाऱ्या मुलांपेक्षा आम्ही मुली बऱ्या," असंही सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात म्हटलं. अजित पवार यांनी शरद पवारांबद्दल आपल्याला मान असला तरी आता त्यांनी निवृत्त व्हावं असं म्हटलं आहे. तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं, आशिर्वाद द्यावा अशी आमची इच्छा आहे, असंही अजित पवार यांनी आपल्या भाषणात म्हटलं.