Ajit Pawar : महायुतीमध्ये जागावाटपावरुन वाद सुरु आहे. अशातच आता अजित पवार गट आणि शिंदे गट यांच्यात नवा वाद रंगला आहे. शिंदे गटातील वाचाळवीरांवर अजित पवार चांगलेच संतापले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्या शिवराळ नेत्यांना आवरावं असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे गटाला इशारा दिला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या विजय शिवतारेंनी दंड थोपटले आहेत. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांविरोधात लोकसभेच्या रणांगणात उतरण्याची घोषणा करत विजय शिवतारेंनी पवारांनाच आव्हान दिलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांनी आपल्या शिवराळ नेत्यांना आवरावं अन्यथा कल्याण लोकसभेचा वेगळा निकाल लागू शकतो असा इशारा राष्ट्रवादी अजित पवार गटानं दिला आहे. शिंदे गटाचे विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर आगपाखड केली होती. बारामती मतदारसंघ कुणाची मक्तेदारी नाही असं म्हणत त्यांनी अजित पवारांवर बेछूट आरोप केले होते. त्यावर आता राष्ट्रवादीही आक्रमक झाली.


शिंदेंनी आपल्या नेत्यांना वेळीच समज द्यावी अन्यथा महायुतीतलं वातावरण बिघडेल आणि कल्याण लोकसभेच्या निवडणुकीत त्याचे पडसाद उमटतील असा इशारा अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी दिलाय. बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद आणि भावजयीमध्ये लढाई  होणार अशीच चर्चा होती.. मात्र या लढाईत आता तिस-या खेळाडूने एन्ट्री केलीय.. पवारांच्या विरोधात तब्बल 5 लाख 80 हजार मतदार असल्याचा दावा शिवतारेंनी केलाय.. तेव्हा बारामतीत पवारांच्या अडचणी वाढणार आहेत. 


विजय शिवतारे हे अजित पवारांचे कट्टर विरोधक.  शिवतारे आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते.. मात्र नंतर त्यांनी हाती शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला.. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांवर शिवतारेंनी जोरदार टीका करायला सुरुवात केली होती.. तेव्हा 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी जाहीर आव्हान देत विजय शिवतारेंना पराभूत केलं होतं. 


अजित पवारांनी 2019 मध्ये बोलून विजय शिवतारेंना पाडलं होतं.. तेव्हा विजय शिवतारे त्या पराभवाचा वचपा बारातमी लोकसभा मतदारसंघात काढणार असल्याची चर्चा आहे.
महायुतीत असले तरी विजय शिवतारे बारामतीमधून पवारांविरोधात लोकसभा लढवण्यावर ठाम आहेत.. तेव्हा येणा-या लोकसभा निवडणुकीत बारामतीत दोन पवार विरुद्ध विजय शिवतारे अशी लढाई होणार असल्याची चर्चा आहे.