मुंबई : जे एसटी कर्मचारी अजूनही कामावर रुजू झालेले नाहीत त्यांना अखेरची संधी देण्याची मुदत आज संपत आहे. ते कर्मचारी हजर झाले नाही तर त्यांच्याबाबत उद्यापासून मात्र कठोर निर्णय घेतला जाईल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसटी कर्मचारी यांच्याबाबत सरकारने आतापर्यत लवचिक धोरण स्वीकारले होते. त्यांचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होणार नाही याची कल्पना त्यांना दिली आहे. त्यांचे पगार वाढवून दिले, सुविधा दिल्या. तरीही ते जर आपल्या मागण्यांवर ठाम असतील तर सरकारलाही विचार करावा लागेल.


एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जनतेचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे आता कारवाई करण्याची वेळ आली आहे. जे कामगार कामावर हजर होणार नाहीत त्यांची सेवा संपुष्ठात आणण्याची कारवाई होऊ शकते. त्यांच्या जागी नवीन कामगार आणण्यात येऊ शकतात असे संकेत त्यांनी दिले.


 



मुंबईत बेस्ट आणि पुण्यात pmp च्या बसेस आहेत. प्रति किलोमीटर त्यांचा होणाऱ्या खर्च हिशोब काढला तर आताच्या खर्चापेक्षा कमी खर्च येत आहे. एसी बस असल्यामुळे प्रवाशांनाही अधिक सुविधा मिळत आहेत. त्यामुळे आमच्यासमोर अनेक पर्याय आहेत, असे ते म्हणाले.


कर्मचारी न्यायालयात गेले आहेत. पण, सरकारने निर्णय घेतला आहे. न्यायव्यवस्था आपल्या जागी सर्वोच्च आहे. पण त्यांनी दिलेली मुदत संपली की पुढे निर्णय घेण्याचे अधिकार जनतेने निवडून दिलेल्या मंत्रिमंडळाकडेच येतात. त्याआधारे आम्ही निर्णय घेऊ शकतो असे सुतोवाच त्यांनी केले.