अजित पवारांचे राजीनामानाट्य म्हणजे `एंटरटेनमेंट` - निलंगेकर
`२० दिवसांवर निवडणुका असताना कुठलेही ठोस विषय-मुद्दे राष्ट्रवादी काँग्रेस जवळ नाहीत.`
शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिलेल्या राजीनामा नाट्यावर त्यांनी स्वतः केलेल्या खुलाशानंतर जवळपास पडदा पडला असताना भाजप नेते यावर टीकेची झोड उठवीत आहेत. एकीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रकांत पाटील हे पवार कुटुंबात शांतता राहावी म्हणून कोल्हापूरच्या अंबामातेला प्रार्थना करू असे सांगत आहेत.
तर दुसरीकडे भाजप नेते तथा राज्याचे अन्न-नागरी पुरवठा मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी हा संपूर्ण प्रकार म्हणजे फक्त 'एंटरटेनमेंट' असल्याची टीका केली आहे. ते लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिवपूर येथे प्रचार दौऱ्यावर असताना झी २४ तासशी बोलत होते.
२० दिवसांवर निवडणुका असताना कुठलेही ठोस विषय-मुद्दे राष्ट्रवादी काँग्रेस जवळ नाहीत. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून चर्चेत राहण्यासाठी केलेला हा प्रकार असल्याची टीकाही संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे. अजित पवार यांच्या राजिनाम्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्यात.