मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नीच्या हस्ते?
यवतमाळ हा राज्यातील सर्वाधिक आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे.
यवतमाळ: गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रंजक ठरण्याची शक्यता आहे. यंदाच्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते करण्याचा विचार महामंडळ करत आहे. यवतमाळ हा राज्यातील सर्वाधिक आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. या पार्श्वभूमीवर मराठी साहित्य संमेलन रद्द करून तो निधी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना देण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र, आता साहित्य महामंडळ आणि आयोजक एखाद्या कर्तृत्ववान आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नीच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्याचा अभिनव विचार करत आहे. आज दुपारी साहित्य महामंडळ आणि आयोजकांची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. त्यावेळी याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल.
साहित्य संमेलन महामंडळ अध्यक्ष श्रीपाद जोशींचा राजीनामा
या संमेलनाला सुरुवातीला उद्घाटक म्हणून प्रख्यात इंग्रजी साहित्यिका नयनतारा सहगल यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, स्थानिक राजकारण्यांच्या दबावामुळे आयोजकांनी परस्पर नयनतारा सहगल यांना संमेलनाला न येण्याचा निरोप धाडला होता. यानंतर साहित्यवर्तुळातून महामंडळ आणि आयोजकांवर सडकून टीका झाली होती. तेव्हापासून आयोजक आणि साहित्य महामंडळ नव्या उद्घाटकाच्या शोधात आहे. मध्यंतरी आयोजकांनी ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार, कवी विठ्ठल वाघ आणि सुरेश द्वादशीवर यांच्या नावाचा प्रस्ताव पुढे केला होता. मात्र, इतक्या वादानंतर कोणताही साहित्यिक उद्घाटकाचा मान स्वीकारायला तयार नाही. त्यामुळे आता साहित्य महामंडळ आणि आयोजकांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नीच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्याचा नवा मार्ग काढला आहे.
मराठी साहित्य संमेलन : नयनतारा सहगल यांना न बोलविण्यामागचे खरे कारण...