... तर मंत्र्यांना भर चौकात कपडे काढून मारणार - स्वाभिमानी शेतकरी संघटना
शेतकऱ्यांच्या दुधाचे दर कमी करणाऱ्या मंत्र्यांना भर चौकात कपडे काढून मारणार असल्याचं वादग्रस्त वक्तव्य.
अकोला : शेतकऱ्यांच्या दुधाचे दर कमी करणाऱ्या मंत्र्यांना भर चौकात कपडे काढून मारणार असल्याचं वादग्रस्त वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केलंय. दूध दरासाठी स्वाभिमानीचं आंदोलन सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अकोल्यात आपल्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आले असताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
सरकारला अल्टीमेटम
दुधाच्या अनुदानावरुन दुध व्यावसायिक संघ आता चांगलेच अक्रमक झालेत. सरकारनं दुधाला प्रतिलिटर 5 रुपये अनुदान घोषित केलय. मात्र ते अनुदान दूध संघांना मिळालं नसल्यानं पुन्हा प्रश्न निर्माण झालाय. सरकारला येत्या 6 तारखेपर्यंत अनुदानासाठी अल्टीमेटम देण्यात आलाय. अन्यथा अकरा तारखेपासून पंचवीस रुपयानं दुध खरेदी बंद करण्याचा इशारा दुध व्यावसायिक संघांनी दिलाय.
सरकार अनुदान देण्यास चालढकल करत असल्याचा आरोपही दुध संघांनी केलाय. दुधाच्या थकीत अनुदाना संदर्भात शनिवारी पुण्यात दुध उत्पादक प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाची आणि विभागीय दुग्ध विकास अधिकारी यांच्यात बैठक झाली. या बैठकीला गोकूळ, वारणा, राजारामबापू, डायनॉमीक्स, सोनाईसह अनेक दुध उत्पादक संघांनी हजेरी लावली होती.