अकोल्यात वाचनालयाचा अनोखा विक्रम
एका अनोख्या विश्वविक्रमासाठी एक उपक्रम राबविण्यात आला आहे.
अकोला : एका अनोख्या विश्वविक्रमासाठी एक उपक्रम राबविण्यात आला आहे.
अकोल्याच्या कपडा बाजार परिसरात १९१८ मध्ये सनातन धर्मसभा वाचनालयाची स्थापना करण्यात आली होती. आज १०१ व्या वर्षात पदार्पण करणा-या या वाचनालयानं थेट विश्वविक्रमाला गवसणी घालणारा उपक्रम हाती घेतला. बारा तासांत वाचनालयात सर्वाधिक विद्यार्थ्यांची सदस्य नोंदणी आणि पुस्तकं देण्याचा हा उपक्रम होता.
६ ते १६ वयोगटातील विद्यार्थ्यांची नोंदणी यात करण्यात आली. सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत ही नोंदणी करण्यात आली. याआधीचा विश्वविक्रम १२०० विद्यार्थ्यांच्या नोंदणीचा असल्याची माहिती आयोजकांनी दिलीये. हा रेकाँर्ड डिसेंबर २०१६ मध्ये करण्यात आला होता. या उपक्रमात दोन हजार विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. त्यामूळे हा नवा विक्रम अकोल्याच्या नावे होण्याची शक्यता आहे. हा नविन विश्वविक्रम असल्याचा दावा हे वाचनालय 'गिनिज बूक आँफ वर्ल्ड रेकाँर्ड'कडे सादर करणार आहे.