अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवण्यासाठी सख्ख्या बहिणींचा काटा काढला; सूपमध्ये विष टाकून घेतला जीव
Alibaug News Today: भावानेच काढला दोघा सख्ख्या बहिणींचा काटा.अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Alibaug News: मालमत्तेचा हव्यासापोटी रक्ताचीच नाती जीवावर उठतात अशा अनेक घटना हल्ली सर्रास घडत असतात. अलिबागमध्येही नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. भावानेच सख्ख्या बहिणींचा जीव घेण्यासाठी केलेले कृत्य पाहून अंगावर काटा येईल. मालमत्तेच्या लालसेतून भावानेच सख्ख्या बहिणींचा काटा काढला आहे.
मालमत्तेच्या लालसेतून सख्ख्या भावानेच दोघा बहिणींचा काटा काढल्याची धक्कादायक घटना अलिबाग तालुक्यातील रेवदंडा इथं समोर आलीय. सोनाली मोहिते आणि स्नेहा मोहिते अशी या मृत बहिणींची नावे आहेत. तर आरोपी गणेश मोहिते याला पोलिसांनी अटक केली असून त्याला २५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
बहिणींची हत्या करण्यासाठी त्याने अत्यंत थंड डोक्याने कट रचला होता. आरोपी गणेश मोहिते याने बहिणींचा काटा काढण्यासाठी सुपात उंदीर मारण्याचे विष टाकून ते दोघींना प्यायला दिले. त्यात दोघींचाही मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी बहिणी संमती पत्र देत नव्हत्या. याचा राग गणेशच्या मनात होता. शिवाय या दोघींना संपवले तर वडिलोपार्जित मालमत्ता आपल्यालाच मिळेल, असा विचार त्याच्या डोक्यात होता. त्यानंतर गणेशने अत्यंत शांत डोक्याने हे कृत्य केले आहे.
गणेश हा उच्चशिक्षित आहे त्याचे दोन बहिणी व आईसोबत पटत नव्हते. तसंच, अनुकंपाच्या नोकरीवरुन सतत वाद होत होते. या गोष्टीचा राग मनात धरुन गणेशने दोघी बहिणींना संपवण्याचा कट रचला. त्याने मागील रविवारी दोघींसाठी सूप बनवले होते. त्यामध्ये विषारी औषध टाकून दोन्ही बहिणींना ते पिण्यासाठी दिले. त्यानंतर दोघींचाही मृत्यू झाला.
धक्कादायक म्हणजे, गणेशने कट रचण्यापूर्वी गुगलवर सर्च करुन सर्व माहिती देखील मिळवली होती. कोणते विषारी औषध जेवणातून व पाण्यातून दिले तर वास येणार नाही याची खात्री करण्यासाठी साधारण 53 वेळा गुगलवरुन माहितीदेखील घेतली होती. या प्रकरणात सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न गणेशने केला. मात्र पोलिसांनी योग्य रीतीने तपास करून त्याचे कृत्य उघडकीस आणले.