अलिबागच्या समुद्रकिनारी पर्यटकांच्या जीवाशी खेळ; भयंकर अपघाताचा Video पाहून धडकी भरेल
Alibaug News : सुट्टीच्या निमित्तानं शहराच्या नजीकचं ठिकाण म्हणून अलिबागला जाताय? पाहून घ्या तेथील समुद्रकिनाऱ्यांवर नेमकं काय सुरुये...
Alibaug News : दोन दिवसांची सुट्टी असो किंवा मग मोठ्या सुट्टीची लॉटरी असो. प्रत्येक वेळी शक्य होईल तेव्हा तेव्हा शहरी धकाधकीपासून आणि दैनंदिन आयुष्यातून वेळ काढत एखाद्या निवांत ठिकाणी जाण्याला अनेकांचच प्राधान्य असतं. मुंबई, नवी मुंबई, ठाण्यातील बहुतांश मंडळी किंबहुना अगदी पुण्याकडीलही काही हौशी मंडळी एका अशा ठिकाणाची वाट धरतात, जिथं कायमच ये-जा करणाऱ्यांची वर्दळ असते. हे ठिकाण म्हणजे अलिबाग.
अनेक ठिकाणांपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या आणि वाहतुकीसह पर्यटकांच्या सोयीनंही चांगल्या सुविधा असणाऱ्या या अलिबागमध्ये येणाऱ्यांचा आकदा गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या फरकानं वाढला आहे. अशा या अलिबागमध्ये सध्या मात्र एक भीतीची लाट पाहायला मिळत आहे, कारण ठरतंय ते म्हणजे पर्यटकांच्या जीवावर बेतणारे काही खेळ आणि या साऱ्याकडे यंत्रणांकडून होणारं दुर्लक्ष.
अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यांवर नेमकं काय सुरुये?
समुद्रकिनारे आणि नारळाच्या मोठमोठ्या बागा असं चित्र असणाऱ्या अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर अनेक भागांमध्ये पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. त्यातच अनेकांचे पाय किनाऱ्यांवर असणाऱ्या 'वॉटर स्पोर्ट्स'कडेही फिरतात. पण, आता हेच थरारक खेळ पर्यटकांच्या जीवाला घोर लावताना दिसत आहेत.
हेसुद्धा वाचा : Budget 2024: पगारवाढ, पेन्शन अन्... यंदाच्या बजेटकडून असलेल्या 8 अपेक्षा
28 जानेवारी रोजीच अलिबागच्या समुद्रकिनारी एटीव्ही बाईक चालवत असताना एका अल्पवयीन चालकाचं नियंत्रण सुटलं आणि भयंकर अपघात झाला. बाईकस्वाराचं नियंत्रण सुटल्यामुळं बाईकनं थेट तिथं असणारा उंट आणि पर्यटकांनाच धडक दिली. धडक लागल्यामुळं उंट उसळला आणि त्याच्यासह बाईकवरील पर्यटकही जमिनीवर आदळला. या अपघातामध्ये काही पर्यटकांना जबर दुखापत झाली. पण, इतका गंभीर अपघात होऊनही तक्रार मात्र दाखल झाली नाही.
यंत्रणांचं लक्ष कुठंय?
अल्पवयीन मुलांना कामावर ठेवणं हा गुन्हा असतानाही समुद्रकिनाऱ्यांवर असणाऱ्या एटीव्ही बाईकवर अनेकदा ही अल्पवयीन मुलंच इतरांना मार्गदर्शन देताना दिसतात. ज्यामुळं अनेक अपघाताच्याही घटना घडतात. या साऱ्याकडे अद्यापही पोलीस, मेरिटाईम बोर्ड आणि स्थानिक प्रशासनाचं लक्ष दात नसल्यामुळं ही अधिक चिंतेची बाब ठरत आहे. पर्यटनासाठी येणाऱ्यांची सुरक्षितता ही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या प्रशासनासह किनाऱ्यांवर व्यवसाय करणाऱ्यांचीही जबाबदारी आहे. पण, त्याची पूर्तता मात्र इथं होताना दिसत नसल्यामुळं आतातरी प्रशाशन इथं लक्ष घालणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.