प्रफुल्ल पवार, झी मीडिया, अलिबाग : गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर सायबर गुन्हेगारांकडून (Cyber Crime) लोकांची फसवणूक (Fraud) करण्याचे प्रकार वाढले आहेत. सोशल मीडियावर एकट्या असलेल्या युजर्सना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांना ब्लॅकमेल (Blackmail) करत मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्यात येत आहेत. अनेक जण काही क्षणाच्या आनंदासाठी याला बळी पडत आहेत. पुण्यात (Pune) याच प्रकाराला बळी पडत दोघांनी आत्महत्या देखील केल्या आहेत. त्यामुळे आता अशा प्रकारची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अनेक जण तक्रार देण्यासाठी पुढे देखील येत आहेत. असाच काहीसा प्रकार अलिबागमध्ये (Alibag) घडलाय. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी (Raigad Police) अटक केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलिबागमधील एका तरुणाला आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात ओढत त्याच्याशी शारीरीक संबंध ठेवतानाचा व्हिडीओ काढून पैशांसाठी ब्लॅकमेल करणाऱ्या दोघांना रायगड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुंबईतील चर्चगेट इथं फिल्मी स्टाईलमध्ये सापळा रचून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. धनश्री तावरे आणि संजय सावंत अशी आरोपींची नावे आहेत. यातील महिला आरोपीला चर्चगेट तर संजय सावंत या आरोपीला अलिबाग येथून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आता आरोपींकडे या प्रकरणी अधिक चौकशी सुरु केली आहे.


नेमकं काय झालं?


मुंबई येथून अलिबागला जागा पाहण्याच्या हेतूने आलेल्या तरुणीने अलिबागमधील तरुणाला आपल्या जाळ्यात प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. त्यानंतर ते दोघेही जवळ आले आणि त्यांनी शारीरिक संबंध ठेवले. या सर्वांचे तरुणीने व्हिडीओ शूटिंग केले होते. यानंतर तरुणीने शारीरीक संबधाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची मागणी केली. तरुणी वारंवार फोन करुन पैशांची मागणी करत धमकी देऊ लागली. यानंतर तरुण मानसिक तणावाखाली गेला. शेवटी कंटाळून त्याने मांडवा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला.


कशी केली अटक?


11 फेब्रुवारी रोजी तरुणीने फोन करुन तरुणाला पाच लाख रुपये घेऊन चर्चगेट इथे बोलवले. यावेळी रायगड पोलिसांनी तरुणीला रंगेहाथ पकडण्यासाठी चर्चगेट परिसरात सापळा रचला होता. आरोपी तरुणीने फोन करत तरुणाला चर्चगेट रेल्वे स्टेशनवर बोलावले. त्यानंतर काही वेळातच आरोपी धनश्री तिथे आली. पोलिसह धनश्रीला पाहून सतर्क झाले आणि काय घडतंय याची वाट पाहू लागले. त्यावेळी आरोपी धनश्री तक्रारदार तरुणासोबत तिथे वाट पाहण्याचे नाटक करु लागली. थोड्यावेळाने धनश्रीचा भाचा तिथे आला आणि त्याने तरुणाकडून पैशाची पिशवी घेतली आणि जाण्यासाठी निघाला. तितक्यात पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीनंतर भाच्याचा यामध्ये सहभाग नसल्याची माहिती समोर आली. तो धनश्रीच्या सांगण्यावरुन तिथे आला होता.


यानंतर पोलिसांनी धनश्रीकडे सखोल चौकशी केल्यानंतर तिचा साथीदार अलिबाग येथीलच असल्याचे समोर आले. पोलिसांनी तपास करत मौजे तळवडे या गावातून दुसरा आरोपी असलेल्या संजय सावंत याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना गुन्हयात अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.