Alibaug Renaming Demand Issue: भारतीय जनता पार्टीचे नेते तसेच विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरांनी अलिबागचे नाव बदल्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली आहे. मात्र नामांतरणाच्या या मागणीमुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नार्वेकरांनी केलेली ही मागणी अलिबागकरांना फारशी पटलेली नाही. अगदी सोशल मीडियापासून ते अलिबागमधील आजी माजी राजकारणाऱ्यांपर्यंत अनेकांनी नार्वेकरांच्या मागणीचा विरोध केला आहे. नार्वेकरांनी काय मागणी केली? अलिबागचं नाव बदलून कोणतं नाव देण्याची मागणी झाली आहे? यावर स्थानिकांचं काय म्हणणं आहे? हे सारं प्रकरण काय आहे समजून घेऊयात...


नार्वेकर नेमकं काय म्हणाले, नाव बदलण्याचा काय संदर्भ दिला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलिबागचे नाव बदलण्यात यावे अशी मागणी करणारं एक पत्र मुख्यमंत्री शिंदेंना दिलं होतं. अलिबागचं नाव बदलून मायनाक नगरी करावं असं या पत्रात म्हटलं होतं. "औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद पाठोपाठ आता अलिबागचे नाव बदलून मायनाक नगरी करण्यात यावे," असा उल्लेख या पत्रात होता. तसेच नाव का बदललं जावं याबद्दलचा युक्तीवाद करताना नार्वेकरांनी, "अलिबाग येथील खांदेरी-उंदेरी बंदरावरील किल्ला आणि तेथील मायनाक भंडारी यांनी केलेल्या चिवट पराक्रमी संघर्षामुळे इंग्रजांना माघार घेण्यास भाग पाडले. मायनाक भंडारी यांनी स्वराज्याचे रक्षण केले होते. त्यामुळे औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबादनंतर अलिबागचे नाव बदलून मायनाक नगरी करण्यात यावे," असं म्हटलं होतं. तसेच अलिबागमध्ये मायनाक भंडारी यांचे भव्य स्मारक उभारण्यात आलं पाहिजे अशी मागणीही नार्वेकरांनी पत्रातून केली होती.


कान्होजीराजे आंग्रेंच्या वंशजांचा विरोध


नार्वेकरांनी केलेल्या मागणीवरुन गुरुवारी अलिबागमधील वातावरण तापल्याचं पाहाया मिळालं. अनेकांनी उघडपणे नार्वेकरांच्या या मागणीचा विरोध केला. सरखेल कान्होजीराजे आंग्रेंचे वंशज रघुजीराजे आंग्रेंनी नार्वेकराच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे. रघुजीराजे आंग्रेंनी नार्वेकरांच्या मागणीचा निषेध केला. तसेच त्यांनी अलिबागचे नाव बदलाची गरज नाही असं म्हटलं. तसेच शहराचं नाव बदलायचे असेल तर सरखेल कान्होजीराजे आंग्रेंच्या नावाचा विचार प्राधान्याने व्हायला हवा अशी मागणी रघुजीराजे आंग्रेंनी केली. नार्वेकरांनी केलेल्या मागणीचा विरोध करताना गुरुवारी सोशल मीडियावर अनेक अलिबागकरांनी ‘आय लव अलिबाग’ हा ट्रेण्ड व्हायरल केला होता.


सर्व पक्षीय अलिबागकरांकडून कडकडून विरोध


अलिबागमधील जवळपास सर्वच स्थानिक नेत्यांनी नार्वेकरांच्या या मागणीला कडकडून विरोध केला आहे. शहराचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनीही नार्वेकरांच्या मागणीला विरोध केला. "नार्वेकरांनी केलेली अलिबागच्या नामांतराची मागणी चुकीची असून त्यांचा विरोध व्हायलाच हवा. मुळात अलिबागकरांनी नामांतराबाबत मागणी केलेली नाही. अशावेळी नार्वेकरांनी नामांतराची मागणी करण्याची गरजच नाही," असं नाईक यांनी आपली भूमिका मांडता म्हटलं आहे. तसेच माजी नगरसेवक अमर वार्डे यांनी, "अलिबागमध्ये नाक खुपसण्याची राहुल नार्वेकरांना काय गरज आहे?" असा थेट सवाल उपस्थित केला आहे. काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष योगश मगर यांनीही नार्वेकरांवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. "अलिबागचे नाव आहे तेच चांगले आहे बदलण्याची गरज नाही. नार्वेकर निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन अलिबागमधील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आधी अलिबागचा इतिहास समजून घेणे गरजेच आहे. तर कलियुगातील रामशास्त्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल नार्वेकर यांनी अलिबाग शहराच्या नामकरणात नारदाची भूमिका बजावू नये," असं मगर यांनी म्हटलं आहे.