शिवसेनेचा आणखी एक आमदार अडचणीत, 2 वर्षांची शिक्षा, पण...
शिवसेनेच्या आणखी एका आमदाराच्या अडचणीत वाढ झाली आहे. अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे शिवेसेनेचे आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांना न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे.
प्रफुल्ल पवार, झी मीडिया, अलिबाग : अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे शिवेसेनेचे आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांना न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे. न्यायालयाने मारहाण प्रकरणात आमदार दळवी यांच्यासह इतर 4 जणांना दोषी ठरवलं आहे. अलिबाग सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. न्यायालयाने दळवी यांना 2 वर्षांचा साधा कारावास आणि 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला. मात्र काही वेळेतेच दळवी यांनी वरच्या न्यायालयात दाद मागितल्यानंतर त्यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला. (alibaug session court give 2 years jail to shiv sena mla mahendra dalvi after high court he given bail)
नक्की प्रकरण काय?
अलिबाग तालुक्यातील एका गावात 2014 मध्ये मारहाणीची घटना घडली होती. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्यावेळेस हा सर्व राडा झाला होता. या प्रकरणी दळवी यांच्यासह 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
अलिबाग सत्र न्यायालयाने शुक्रवारी या प्रकरणावरुन निकाल दिला. न्यायालयाने या वेळेस आमदार दळवी यांच्यासह अनिल पाटील, अंकुश पाटील आणि अविनाश म्हात्रे यांना दोषी ठरवलं. यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 324, 143, 147, 148, 504, 506 तसेच मुंबई पोलीस ॲक्ट 134 नुसार दोषी ठरवण्यात आलं.
दरम्यान सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला दळवी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं. यावेळेस न्यायालयाने जामीन मंजूर केला. तसेच दळवी यांनी उच्च न्यायालयाला सत्र न्यायालयाने दिलेला निर्णय स्थगित करावा, असा अर्जही दिला आहे.