COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लातूर : लातूर शहरातील सर्व खाजगी कोचिंग क्लासेस बंद ठेवण्यात आले आहेत. स्टेप बाय स्टेप कोचिंग क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण यांच्या हत्येच्या निषेधार्थ क्लास चालकांनी हा बंद पाळलाय. यामुळे मात्र विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होतय. तर नेहमी विद्यार्थ्यांनी फुललेलं लातूरचं उद्योग भवन ओस पडलंय. खासगी कोचिंग क्लासेसच्या व्यावसायिक स्पर्धेतून अविनाश चव्हाण यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय. या हत्या प्रकरणातील सर्व पाचही आरोपींना जिल्हा न्यायालयानं तीन जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय. 


कुमार मॅथ्स क्लासेसचे प्रमुख चंदनकुमार शर्मा यांनी ही हत्येची सुपारी दिली होती. व्यावसायिक स्पर्धेतून ही हत्या करण्यात आली. चंदनकुमार शर्मा, करण, अमोल शेंडगे, महेशकुमार रेड्डी आणि शरद घुमे अशा पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून रिव्हॉल्वर आणि १३ काडतुसं जप्त करण्यात आली आहेत.


३६ तासात लातूर पोलिसांना या हत्येचा छडा लावण्यात यश आलं. रविवारी मध्यरात्री अविनाश चव्हाण यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.


अविनाश चव्हाण यांची हत्या करण्यासाठी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी निलंगेकर पाटील यांचा एकेकाळी अंगरक्षक असलेल्या करण सिंहनं सुपारी घेतल्याचं पुढं आलंय. सध्या लातूरमध्ये वास्तवास असलेला करण सिंह हा शिरूर अनंतपाळ तालुक्यातील रहिवासी आहे. करण सिंह याला ही सुपारी देण्यात आली होती. विशेष बाब म्हणजे हा करणसिंग लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा खाजगी अंगरक्षक म्हणून अनेक दिवस काम करीत होता.


पालकमंत्र्यासोबत त्याचे अनेक फोटो हे आजही फेसबूकवर आहेत. या प्रकरणातील आरोपी असलेले महेशकुमार रेड्डी आणि शरद घुमे या दोन मध्यस्थांकडून साडे आठ लाख रुपयेही करणसिंहला देण्यात आले होते. त्यानंतर आपला साथीदार अमोल शेंडगेच्या मदतीनं करण सिंहनं अविनाश चव्हाणवर लातूरच्या शिवाजी शाळेजवळ गोळीबार केला. ज्यात अविनाश चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. करण सिंह याच्यासह पाच जणांना अटक करण्यात आलीय.