खरिपाच्या तयारीसाठी शेतशिवारात लगबग
लॉकडाऊन मध्ये खरीप हंगामाच्या तयारीला शेतकरी जोमाने कामाला
यवतमाळ : यंदा कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनमध्ये खरीप हंगामाच्या तयारीला शेतकरी जोमाने कामाला लागला आहे. यवतमाळ जिल्ह्यात जवळपास ९ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचा अंदाज आहे. शेतकऱ्यांच्या हातात पीककर्जाअभावी आणि शेतमाल विक्री न झाल्याने पैसा नाही अशा बिकट परिस्थितीत बळीराजा काळ्या मातीत घाम उपसत आहे.
चालू आठवड्यानंतर राज्यात मान्सून च्या आगमनाचा अंदाज आहे त्यामुळं खरिपाच्या तयारीसाठी शेतशिवारात लगबग आहे. यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील सुनंदा आत्राम व त्रिशक्ती हे मायलेक भर उन्हात आपल्या पाच एकर दगडी शेतजमिनीत घाम गाळत आहेत. लॉकडाऊन मुळे त्यांनी आपल्या शेतातील निम्मा कापूस खाजगी व्यापाऱ्याला पडलेल्या भावात विकला तर निम्मा कापूस अजूनही घरात शिल्लक आहे. गेल्या ३ महिन्यात हाताला काम नव्हते परिणामी त्यांच्या हातात पैसे नाही. त्यामुळं संपूर्ण आत्राम कुटुंब भल्या पहाटेपासूनच शेतात राबून दगड वेचून बांधावर टाकत आहेत. दगडी जमीन असल्याने पहिल्या पावसानंतरच त्यांच्या शेतात नांगर चालणार आहे. त्यामुळं चांगल्या मान्सूनच्या आगमनाची प्रतिक्षा आत्राम मायलेक करीत आहे.
यवतमाळ तालुक्यातील वाकी गावात देखील लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या बळीराजाला आता पेरणीची ओढ लागली आहे. उत्तम बन्सोड हे मेहनती शेतकरी सूर्य डोक्यावर असताना देखील शेतजमिनीची वाई करीत आहे. त्यांच्याप्रमाणेच ईतर शेतकरी शेतातील काडीकचरा वेचणे, नांगर फळी चालविणे आदी मान्सूनपूर्व शेतीकामात व्यस्त आहे. कुठे बैलजोडीची अडचण तर कुठे ट्रॅक्टरची अडचण असली तरी व्ही-पास, वखर आदींच्या साहाय्याने शेत मशागत केल्या जात आहे. रब्बीतील भुईमूग, कांदा काढणीला देखील वेग आला आहे. शेतात धरणातील गाळ, शेणखत टाकून जमिनीचे आरोग्य सुधारण्याचेही काम सुरु आहे.
लॉकडाऊन चा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अडचणीच्या या काळात खरिपासाठी बी-बियाणे पेरणीसाठी पैसा आणायचा कोठून, या चिंतेत शेतकरी आहेत. पीककर्ज न मिळाल्याने आणि शेतमाल अद्याप घरीच असल्याने शेतकरी हतबल आहेत. तरीदेखील पुन्हा शेतशिवार फुलविण्यासाठी बळीराजा जीवाचे रान करीत आहे.