विकास भदाणे, झी मीडिया, मुंबई : शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री गुलाबराब पाटलांच्या समर्थकांनी भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या दोन समर्थकांना बेदम मारहाण केल्याचा आरोप होत आहे. धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात शुक्रवारी मध्यरात्री हा प्रकार घडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत युती असताना जळगाव ग्रामीण मतदारसंघात मात्र, बंडखोरीमुळे युतीत फूट पडली आहे. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात भाजपचे चंद्रशेखर अत्तरदे यांनी अपक्ष उमेदवारी करत बंडखोरी केलीय. 


याचे तीव्र पडसाद शुक्रवारी मध्यरात्री जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात उमटले. रात्रीच्या वेळी प्रचार करत असल्याचा राग आल्याने गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांनी अत्तरदे यांचे समर्थक असलेल्या भाजपच्या दोन कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. 


पाळधी गावातील रेल्वे गेटजवळ हा प्रकार घडला. किशोर झंवर आणि नितीन पाटील अशी मारहाण झालेल्या दोन्ही भाजप कार्यकर्त्यांची नावे आहेत. 


यातील किशोर झंवर हा भाजपचा धरणगाव तालुका सरचिटणीस आहे. जळगाव येथून चारचाकीने घरी परतत होते, तेव्हा पाळधी गावातील रेल्वे गेटजवळ चारचाकी अडवून गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव तथा जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप किशोर झंवर आणि नितीन पाटील यांनी केला आहे. 


मारहाण केल्यानंतर गुलाबराव पाटलांच्या समर्थकांनी दोघांना पाळधी पोलीस ठाण्यात नेले. तेथे देखील पोलिसांसमक्ष मारहाण केली. मोबाईल हिसकावून घेतले. 



पोलीस ठाण्यात डांबून ठेवत आमची तक्रार दाखल करून घेतली नाही, असेही आरोप त्यांनी केले आहेत. या साऱ्या प्रकारामुळे जळगाव ग्रामीण मतदारसंघात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.