खोपोली-वाकण फाटा झालाय मृत्यूचा सापळा
रस्ते रुंदीकरणाचं काम सुरु पण सुरक्षेच्या उपाययोजना नाही
खोपोली : मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खोपोली ते वाकण फाटा रस्त्याच्या रूंदीकरणाचं काम सध्या सुरू आहे. मात्र हे करत असताना सुरक्षेच्या कुठल्याही उपाययोजना न केल्यानं प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे शासन प्रशासन आणि ठेकेदारांविरोधात जनक्षोभ वाढत चालला आहे. रायगड जिल्हयातील वाकण फाटा ते खोपोली या रस्त्याकडे मुंबई-गोवा महामार्गाला पर्यायी रस्ता म्हणून पाहिलं जातं. सरकारनं हा ४२ किलोमीटरचा रस्ता आता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला असून, या रस्त्याच्या रूंदीकरणाचं काम हाती घेण्यात आलंय. मात्र हे काम करत असताना प्रवाशांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जात नाही. त्यामुळे अनेकदा अपघातांना सामोरं जावं लागत आहे. यासंदर्भात रस्ते विकास महामंडळाकडे वारंवार पाठपुरावा करूनही काहीच उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या लता कळंबे यांनी या रस्त्याच्या कडेलाच १८ जूनपासून उपोषण सुरू केलंय.
या रस्त्यावरून प्रवासी वाहनांबरोबरच अवजड वाहनांचीही वाहतूक सुरू असते. नुतनीकरणासाठी या रस्त्याचा एक भाग ४ ते ५ फुटांपर्यंत खोल खोदण्यात आलाय. तिथे सुरक्षेची कोणतीच व्यवस्था नाही. त्यामुळे अनेकदा अपघात होत असतात. तर मोरीचं काम करताना नैसर्गिक पाण्याचे मार्ग बुजले असून पावसाळयात पाणी रस्त्यावर येऊ शकतं. रस्ते विकास महामंडळ आणि ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे इथं भविष्यात मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. यासंदर्भात उपोषणकर्त्या लता कळंबे यांनी यापूर्वी रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयावर धडक देवून अधिकाऱ्यांना चांगलाच इंगा दाखवला होता. त्यासाठी त्यांना तुरुंगवारीही झाली होती. मात्र आजही या प्रश्नी प्रशासनाकडून कोणत्याच हालचाली होताना दिसत नाहीत.
एकीकडे मुंबई-गोवा महामार्गाचे रूंदीकरण रखडलंय. दुसरीकडे त्याला पर्याय असलेला पाली खोपोली रस्तादेखील खोदून ठेवलाय. त्यामुळे कोकणवासियांची दोन्ही बाजूंनी कोंडी झालीय. यावर तातडीने उपाययोजना झाली नाही तर गणेशोत्सवासाठी कोकणात येणारया चाकरमान्यांचे हाल निश्चित आहेत.