अमळनेर मारहाण : उदय वाघ यांच्याविरोधात दंगलीचा तर बी. एस. पाटलांविरुद्ध एट्रोसिटीचा गुन्हा
भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यासह सहा जणांविरुद्ध अमळनेर पोलिसांत दंगलीचा गुन्हा दाखल
विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अमळनेरचे माजी भाजपा आमदार डॉ. बी. एस. पाटील मारहाण केल्याप्रकणी अखेर भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यासह सहा जणांविरुद्ध अमळनेर पोलिसांत दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, उदय वाघ यांच्यावतीने अमळनेर पंचायत समितीच्या सभापतीनी दिलेल्या फिर्यादी वरून डॉ. बी. एस. पाटलांविरुद्ध पोलिसांत रात्री उशिरा अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याघटनेनंतर उदय वाघ तसच डॉ. बी. एस. पाटील समर्थक पोलीस ठाण्यात समोरासमोर आले. होते यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
तिकीट वाटपावरून हा वाद असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपाचे खासदार बीएस पाटील यांना तिकीट मिळाले नाही, तेव्हा पारोळा शहरात त्यांनी एक सभा घेतली होती. त्या सभेत त्यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्याविरोधात टीका केली होती. यानंतर भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पत्नी, तसेच भाजपाच्या विधान परिषद सदस्य स्मिता वाघ यांना भाजपाचे देण्यात आलेले तिकीट नाकारण्यात आले. यावरून हा वाद असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यादेखत भाजपचे अमळनेरचे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी मारहाणीला सुरवात केल्यानंतर डॉ. पाटील यांनाही कार्यकर्त्यांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण झाली. महाजन यांनी कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला.
भाजप हा शिस्तीचा पक्ष असल्याने पक्षाच्या व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्याकडून या गंभीर कृत्याची अपेक्षा नव्हती अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली होती. तर शिवसेनेने देखील वाघ यांच्या कृत्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे.