अमळनेरच्या स्टेट बँकेत ग्राहकांचे प्रचंड हाल
जिल्ह्यातील अमळनेर शहरातील स्टेट बँक शाखेत व्यवहार करतांना ग्राहकांचे प्रचंड हाल होत आहेत.
जळगाव : जिल्ह्यातील अमळनेर शहरातील स्टेट बँक शाखेत व्यवहार करतांना ग्राहकांचे प्रचंड हाल होत आहेत. यात ज्येष्ठ नागरिकांना सर्वात जास्त त्रास होत आहे. अमळनेर शहरात एसबीआयची एकमेव शाखा आहे. एसबीआयची आणखी १ शाखा वाढवण्याची ग्राहकांची मागणी आहे.
ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल
विशेष म्हणजे येथे ग्राहकांना कुपन देऊन बोलवलं जात नसल्याने, ग्राहक तासंतास रांगेत ताटकळत उभे राहतात. ज्येष्ठ नागरिकांना कोणतीही मदत होत नाही, त्यामुळे त्यांना देखील या गर्दीत ताटकळत बसावं लागतं.
बहुतांश खिडक्या बंद
नव्यानेच बँकेत खातं उघडलेल्या ग्राहकांकडून देखील आधार अपडेटसाठी केवायसी मागितली जात आहे. ग्राहक तरीही गर्दीत रांगेत उभे असतात, पण अनेक काऊंटर नेहमी ओसाड पडली असल्याचं चित्र असतं, आमच्याकडे माणसं कमी असल्याचं मॅनेजर सांगतात, एसबीआयचे काही व्हिडीओ देखील व्हॉटसअॅपवर आले आहेत.
शहरात आणखी एक शाखा गरजेची
शहरात आणखी एका शाखेचा विस्तार होणे गरजेचे असल्याचं काही ग्राहक सांगतात. त्या मानाने एटीएममशीन देखील कमी आहेत, पासबुक प्रिन्टिंग हे प्रत्येक ग्राहकाने मशीनवर करून घ्यायचे आहे, पण प्रिटिंगसाठी प्रचंड गर्दी होत असल्याने, बँकेतील शिपाई प्रिटिंग करण्यासाठी मशीनसमोर बसतात. विशेष म्हणजे ऑटो प्रिटिंगचे स्टिकर लावून घेण्यासाठीही रांग लावावी लागते.
शाखा मोठी पण व्यवस्था नाही
अमळनेर एसबीआयची शाखेची जागा मोठी असली तरी ग्राहकांना बसण्यासाठी व्यवस्थित जागा नाही, कुपनने बोलावले जात नसल्याने, रांगा लागतात आणि अस्ताव्यस्त पण येतो. नेहमी ३ ते ४ खिडक्यांवर कामं सुरू असतात, इतर डेस्क बंद असतात. यामागे कर्मचारी कमी असल्याचं कारण सांगितलं जातं.
तालुक्याचे बहुतांश पुढारी चमको
तालुक्यातील बहुतांश पुढारी सोशल मीडियावर फक्त चमकोगिरी करत असल्याचं चित्र आहे. मात्र सर्वसामान्य आणि ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित असलेली ही अडचण, जिल्हाधिकारी, तसेच एसबीआयच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांकडे मांडायला कुणीही तयार नाही, कारण पुढाऱ्यांचे पाय बँकेला लागत नसल्याने, त्यांना लोकांच्या अडचणी समजून घेता येत नाहीत, असं काही ग्राहक सांगतात. खासदारांनी देखील याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं सांगण्यात येत आहे.
सेन्ट्रलाईज एसी नाही
एवढ्या मोठ्या शाखेला कोणतंही सेन्ट्रलाईज एसी नाही, एसबीआयकडून मोठ्या शहरातील शाखांना एसी लावण्यात येतं पण, येथे तसे कोणतेही एसी नाही, काही अधिकाऱ्यांनाच एसी आहे. दुसरीकडे दररोज शाखेतील कर्मचारी आणि अधिकारी यांच्यातील वाद वाढत आहेत.