अमरावतीत कपाशी पिकांवर लाल्या रोगांचे आक्रमण
मुसळधार परतीच्या पावसाने कपाशी पिकांचे मोठे नुकसान
अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : आधीच संकटाच्या जोखडात अडकलेल्या शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा परतीच्या पावसाने नवं संकट उभं राहीलंय. शेतातील कपाशीच्या पिकाला परतीच्या पावसाचा जबर फटका बसला आहे. शेतात साचलेल्या पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगिर या भागात मुसळधार असा परतीचा पाऊस झाल्याने कपाशी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
परतीच्या पावसाने संकटात सापडलेले सोयाबीन आणि कपाशी उत्पादक शेतकरी चिंतेत असताना आता पुन्हा कपाशी उत्पादक शेतकर्यांसमोर लाल्या रोगाच्या आक्रमनामुळे नवं संकट आलेले आहे.
मागील काही दिवसांपासून सुरू असलेला परतीचा पाऊस आणि त्यात सकाळी पिकावर पडणार दवामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर कपाशी शेतीवर लाल्या रोगाने आक्रमण केले आहे. त्यामुळे हिरव्यागार कपाशीचे शेतं लाल पडली असून कपाशी सुकल्या आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.
सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या परतीच्या पावसामुळे सकाळी दव पडण्याचे प्रमाण जास्त असते. त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या कपाशी पीक, केळी, संत्रा या पिकांवर होतो. या महिन्यात पडणारे दवामुळे काही प्रमाणात तारक तर काही वेळा ते पिकासाठी धोक्याचे असते असे शेतकरी सांगतात.
भरलेले पीक पाहून या वर्षी एकरी पंधरा क्विंटल कापसाची स्वप्न मनात रंगून कर्ज फेडीची अशा शेतकऱ्यांच्या मनात घर करून होती. मात्र मागील काही दिवसांपासून पिकाला लागलेले ग्रहण त्यामुळे खर्च निघणे कठीण झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे जिल्ह्यात केळी पिकाच्या झाडांची वाढ खुंटली तर संत्रा बागांना आलेला संत्रा ही गळून पडत आहे.
यंदा कापूस बाजारपेठेत विकायला नेण्याच्या वेळेत देशात कोरोनाने शिरकाव केला होता. त्यामुळे काही दिवस बाजारपेठा बंद होत्या. दरम्यान शासकीय कापूस खरेदी ही लांबली होती.
त्याचाच फायदा खाजगी व्यापार्यांनी घेत त्यांनी मनमानी दराने कापसाची खरेदी केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाला समोर जावे लागले. त्यात आता अति पावसामुळे कपाशी पिकावर लाल्या रोगाच्या आक्रमक झाल्याने भविष्यात कपाशी पीक घ्यावे की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय.