रायगड : चालकांच्या कामबंद आंदोलनामुळे रायगड जिल्ह्यातील रुग्णवाहिका सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. मात्र प्रशासनाकडून कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. बिव्हीजी इंडिया कंपनीच्या माध्यमातून शासनाकडून डायल १०८ ही रुग्णवाहिका सेवा मोफत दिली जाते. रायगड जिल्ह्यात अशा २२ रुग्णवाहिका आहेत. परंतु त्यावरील चालकांना या महिन्याचा पगार अद्याप मिळालेला नाही, त्यामुळे त्यांनी  आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधीच तुटपुंजा पगार तोदेखील वेळेवर नाही त्यामुळे हे चालक त्रस्त झाले आहेत. यापूर्वीही दोनवेळा त्यांनी  अशाच प्रकारे आंदोलन केले होते. रुग्णसेवेसारख्या अत्यावश्यक सेवेबाबतही शासनाची उदासीनता यातून दिसून येत आहे. इतर चालकांप्रमाणे आम्हाला समान वेतन तेदेखील वेळेवर मिळावे, अशी चालकांची मागणी आहे. पगार मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.