नेरुळः रुग्णवाहिका चालकाच्या हत्येचे गूढ उकलले; वडिलांनी मुलांना हाताशी घेत रचला कट, कारण...
Nerul Crime News: नेरूळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. डॉ. डीवाय पाटील रुग्णालयासमोर एका रुग्णवाहिका चालकाचा चौघांनी गाडीतून खेचून मारहाण करत त्याची हत्या केली आहे.
स्वाती नाईक, झी मीडीया
Nerul Crime News: नेरुळमधील डॉ. डी वाय पाटील रुग्णालयाच्या गेटवर रविवारी रात्री झालेल्या रुग्णवाहिका चालकाच्या हत्या प्रकरणात नेरुळ पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांना चारही आरोपींना अटक करण्यात यश आलं आहे. या आरोपींमध्ये वडिल आणि त्याच्या तीन मुलांचा समावेश आहे.
काय घडलं नेमकं?
मिळालेल्या माहितीनुसार,डॉ.डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या गेटवर असलेल्या नारळ पाण्याच्या स्टॉलचे नुकसान केल्याची माहिती मृत युवराज सिंह याने नारळपाणी विक्रेत्याला दिली होती. तसेच त्याचा व्हिडीओदेखील काढला होता. याच गोष्टीचा राग मनात धरून चौघा पिता पुत्रांनी युवराज सिंह याची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मध्ये अमजद रियाज खान (४५), त्याची मुले समीर खान (२४), शोएब खान (२२) व एक अल्पवयीन मुलगा या चौघांचा समावेश आहे. हे पितापुत्र मानखुर्द येथील पीएमजीपी कॉलनीत राहण्यास असून अमजद खान याचा डी.वाय.पाटील हॉस्पीटलच्या गेटच्या बाजूला अंडा भुर्जी विक्रीचा स्टॉल लावत होता. त्याच्या बाजूलाच इतर विक्रेते नारळपाणी व फळ विक्री करत होते.
पाच ते सहा दिवसापूर्वी आरोपी अमजद खान याने नारळपाणी व फळ विक्री करणाऱ्यांच्या स्टॉलचे नुकसान केले होते. याबाबतचा व्हिडिओ डी.वाय.पाटील हॉस्पीटलमध्ये ॲम्बुलन्स चालवणाऱ्या युवराज सिंह याने काढला होता. तसेच त्याबाबतची माहिती त्याने नारळपाणी व फळ विक्रेत्यांना दिली होती. आरोपी अमजद खान याला, हि बाब समजल्यानंतर त्याने आपल्या मुलांच्या मदतीने ॲम्बुलन्स चालक युवराज सिंह याचा कायमचा काटा काढण्याची योजना आखली होती.
चालकाची कशी केली हत्या?
नवी मुंबईतील नेरुळ येथे डॉ. डी .वाय. पाटील रुग्णालय समोर एका रुग्णवाहिका मदतनिसला चौघांनी गाडीतून खाली खेचून बाहेर काढले. एवढ्यावरच न थांबता त्याला बांबूने बेदम मारहाण केली शेवटी चाकूचे सपासप वार केले. रुग्णवाहिका चालकाचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यावर चालकाच्या मानेत खुपसलेला चाकू तशाच अवस्थेत टाकून आरोपींनी पळ काढला होता. दरम्यान, यावेळी आरोपींनी रुग्णवाहिकेची नासधूसदेखील केली होती.