अमित शाह राज्याच्या दौऱ्यावर, लोकसभा निवडणुकीची चाचपणी
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे उद्या ६ जानेवारी लातूर दौऱ्यावर येत आहेत.
लातूर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे उद्या ६ जानेवारी लातूर दौऱ्यावर येत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील चार लोकसभा मतदारसंघाच्या प्रमुख भाजप पदाधिकाऱ्यांशी ते पक्ष बैठकीत संवाद साधणार आहेत. लातूर-नांदेड-हिंगोली आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास ५ हजार ७१३ भाजप पदाधिकाऱ्यांसोबत ते बैठक घेणार आहेत. ६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत भाजप पदाधिकारी-कार्यकर्ते यांनी नोंदणी करायची आहे. त्यानंतर दुपारी १ वाजता प्रत्यक्ष बैठकीला सुरुवात होईल.
प्रथम सत्रातील या बैठकीला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे मार्गदर्शन करतील. तर अमित शाह हे दुपारी ३ वाजता अमित शाह दिव-दमन येथून विमानाने नांदेड आणि त्यानंतर हेलिकॉप्टरने लातूरला पोहोचतील. त्यानंतर सायंकाळी ४ ते ६.३० वाजेपर्यंत बैठकीचे दुसरे सत्र राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली होईल.
या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहित राज्याचे अनेक भाजपचे मंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी ७.३० वा. जिल्ह्यातील विविध घटकातील प्रमुख निवडक नागरिकांशी दयानंद सभागृह येथे ते संवाद साधतील.