अमरावतीच्या अनाथाश्रमाला जोडणारा पूल वाहून गेला, २० विद्यार्थ्यांचा शहराशी संपर्क तुटला
अमरावतीच्या अनाथाश्रमात जाणारा नाल्यावरचा पूल वाहून गेला आहे.
अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : अमरावतीच्या अनाथाश्रमात जाणारा नाल्यावरचा पूल वाहून गेला आहे. पूल वाहून गेल्यामुळे अनाथाश्रमातल्या २० विद्यार्थ्यांचा शहराशी संपर्क तुटला आहे. एकीकडे कोरोना काळात विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा वापर करावा लागत आहे. कोरोनामुळे राज्यातील शाळा बंद असल्या, तरी अनाथ विद्यार्थ्यांच्या निवासी अनाथ आश्रम सुरू आहेत.
कॅम्प परिसरातील सदाशांती बालगृह अनाथ आश्रम व ज्ञानदेव मराठी प्राथमिक शाळा या एकाच ठिकाणी असलेल्या शाळांमध्ये जाणाऱ्या रस्त्यातील नाल्यावरील पूल वाहून गेला आहे. पूल वाहून गेल्यामुळे विद्यार्थ्यांचा शहराशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे कुणी विद्यार्थी आजारी पडले तर त्याला रुग्णालयात न्यावे तरी कसे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या संदर्भात महानगरपालिकेला तक्रार देऊनही कुठलीही दखल घेतली नसल्याचं शिक्षकांचे म्हणणे आहे.
अमरावती महानगरपालिकेच्या ज्ञानोदय मराठी प्राथमिक शाळा व सदाशांती बालगृह अनाथ आश्रम या दोन्ही शाळा कॅम्प परिसरातील एकाच प्रांगणात आहे. या दोन्ही शाळेत जायला एकच रस्ता आहे. यातील ज्ञानोदय मराठी प्राथमिक शाळेत १६० विद्यार्थी शिक्षण घेतात पण कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थी शाळेत नाहीत. परंतु बाजूलाच असलेल्या अनाथ आश्रमात २० निवासी विद्यार्थी आहे. या शाळेत जाण्यासाठी नाला ओलांडून जावे लागते.
या नाल्यावर काही दिवसांपूर्वी कच्चा फूल तयार करण्यात आला होता. या वर्षी पावसाळ्यात नाल्याला जास्त पाणी असल्याने हा पूल खचला होता. तेव्हा याची तक्रार महानगरपालिकेला देण्यात आली होती, पण त्याची कुठलीच दखल घेतली नव्हती. त्यात काल पासून जिल्हात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे या २० विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा अमरावती शहराशी संपर्क तुटला आहे.
उद्या स्वतंत्र दिन आहे अशा परिस्थितीत झेंडा वंदन कसे करावे`? असा सवाल शिक्षकांनी विचारला आहे.