अंधश्रद्धेचा कळस! अमरावतीमध्ये अल्पवयीन मुलाची अघोरी पूजा करुन गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न
Amravati Crime : अमरावतीमध्ये अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : पुरोगामी महाराष्ट्रात अद्यापही अंधश्रद्धेच्या (Superstition) घटना वारंवार उघडकीस येताना दिसत आहेत. अशातच अमरावतीमध्ये (Amravati Crime) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 11 वर्षीय पायाळू बालकाच्या मदतीने मध्यरात्री अमरावतीच्या टाकळी जहागीर येथील एका महिलेच्या घरात गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आलं आहे. हा सगळा प्रकार सुरु असताना काही गावकऱ्यांना या प्रकाराची चुणूक लागल्याने गुप्तधन शोधण्याचा प्रकार फसला आहे. पोलिसांनी (Amravati Police) याप्रकरणी सर्व आरोपींना अटक करत गुन्हा दाखल केला आहे.
गावकऱ्यांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिल्यानंतर नांदगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्याचे आरोपींना समजताच घटनेतील सर्व आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी फरार झाले. मात्र यातील सहा आरोपींना पकडण्यात नांदगाव पेठ पोलिसांना यश आले.
नेमकं काय घडलं?
टाकळी जहागीर येथील मुक्ता बाभळे (65) यांच्या घरात गुप्तधन असल्याची माहिती त्यांनी जवळच्या एका व्यक्तीला दिली. गुप्तधन काढण्यासाठी एक महाराज, 11 वर्षीय पायाळू बालक आणि चार तांत्रिक व्यक्ती या महिलेच्या घरी आले. घरात पूजापाठ मांडून त्या बालकाची देखील पूजा करण्यात आली आणि घरात धन कुठे आहे यासाठी त्याला चालायला लावले. मात्र या अघोरी प्रकारची चुणूक गावातील काही सुज्ञ लोकांना लागताच त्यांनी याबाबत पोलीसांना माहिती दिली. गावकरी पोलीस येईपर्यंत त्या महिलेच्या घरावर पाळत ठेवून बसले होते. मात्र घरात असलेल्या मांत्रिक आणि महिलेला घराबाहेरील हालचाल लक्षात येताच सर्वांनी पोलीस येण्याच्या आत तेथून पळ काढला. पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल होताच त्यांनी घरात मांडलेली पूजा आणि पूजेसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचा पंचनामा करून मुक्ता बाभळे या महिलेला तसेच महाराज सुखदेव पाटोरकर (भांडुप) यांना ताब्यात घेतले.
महिलेकडे विचारपूस केल्यानंतर तिने सचिन बोबडे याचे नाव घेतले त्यानुसार पोलिसांनी लगेच गौरखेडा कुंभी गाव गाठून फरार झालेला आरोपी सचिन बोबडे याला ताब्यात घेतले. सचिन बोबडे याने पोलिसांसमक्ष या अघोरी कृत्याची कबुली देत यामध्ये समाविष्ट असलेल्या सर्व आरोपींची नावे सांगितली. तपास पथक तेथूनच पुढील फरार आरोपी ताब्यात घेण्यासाठी भैसदेही (मध्यप्रदेश) येथे रवाना झाले आणि तेथून मुख्य आरोपी असलेला रामकिसन अखंडे याला ताब्यात घेतले. तेथून तिसरा मुख्य आरोपी तिवसा येथील सातरगाव येथे दडून बसला होता. पोलिसांच्या पथकाने रवी धिकार आणि त्या 11 वर्षीय बालकालाही ताब्यात घेतले.
पोलिसांनी काय सांगितले?
"नांदगाव पेठच्या हद्दीमध्ये शहरामधील भागातून रात्रीच्या वेळेस पोलीस ठाण्यात फोन आला होता. या भागात कोणीतरी रात्री 12 च्या सुमारास जादूटोणा पूजा करत आहेत अशी माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस ठाण्यातील अधिकारी तिथे पोहोचले. पोलिसांनी पाहिले असता तिथे पूजेसारखा प्रकार मांडला होता. पोलिसांना पाहून तिथले लोक पळून गेले आणि लपून बसले. पोलिसांनी लपून बसलेल्या लोकांना शोधून काढलं. ज्यांच्या घरात हा सगळा प्रकार सुरु होता त्यांची चौकशी केली असता लक्षात आलं की गुप्तधन शोधण्यासाठी काही लोक पूजा करत होते. त्यामध्ये अघोरी पूजा करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. यासाठी एका 11 वर्षाच्या मुलाला वडिलांसह आमिष दाखवून आणण्यात आलं होतं. मुलाला तिथे जबरदस्तीने बसवून गुप्तधन कुटे आहे अशी विचारणा त्याच्याकडे करत होते. हा सगळा अंधश्रद्धेचा प्रकार असल्याचे उघडकीस आला आहे. याप्रकरणी जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपींना अटक करुन न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे," अशी माहिती अमरावतीचे पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी दिली.