दीपक भातुसे, मुंबई : दिवसभरात सरासरी 17 कोटी रुपयांच्या दारूची विक्री झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मागील 42 ते 43 दिवस राज्यभरात दारूची दुकानं लॉकडाऊनमुळे बंद होती. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने कालपासून दारू विक्रीचा निर्णय घेतल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली. मात्र ही गर्दी जास्त दिवस राहणार नाही, आज किंवा उद्यापर्यंत ही गर्दी संपेल असा विश्वास राज्याचे उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमप यांनी झी 24 तासशी बोलताना व्यक्त केला आहे. जिथे गर्दी होईल तिथली दुकानं काही काळासाठी बंद करण्याची कारवाई स्थानिक प्रशासन करत आहे. त्यामुळे नियम पाळले नाहीत तर दारूची दुकानं बंद होतील हे लक्षात घेऊन ग्राहकांनी शिस्त पाळावी असं आवाहन उमप यांनी केलं आहे. तसंच गर्दी टाळण्यासाठी दुकानांनी टोकन द्यावे अशा सूचना देण्यात येणार आहेत. 


काल किरकोळ दारूची दुकानं सुरू झाली आहेत, यात काही जिल्ह्यात दुकानं बंदच आहेत, तर ज्या जिल्ह्यात सुरू आहेत तिथलीही सर्व दुकानं सुरू नाहीत. याशिवाय हॉटेलमधील विक्रीही बंद आहे. त्यामुळे काय दिवसभरात 15 ते 17 कोटी रुपयांची दारू विक्री झाली असण्याची शक्यता आहे. काही राज्यांनी दारू विक्रीवर जादा कर लावला आहे. मात्र आपल्या राज्यात दारूवर पूर्वीपासूनच जादा कर आकारला जातो. दिल्लीने 70 टक्के कर वाढवला असला तरी आपल्या राज्यातील कर सध्या त्यापेक्षाही जास्त आहे, अशी माहिती कांतीलाल उमप यांनी झी 24 तासशी बोलताना दिली.