आनंदवारी: माऊलींची पालखी लोणंदकडून तरडगावकडे मार्गस्थ
तुकोबांच्या पालखीचा आजचा मुक्काम सणसर येथे असणार आहे.
लोणंद: माऊलींची पालखी आज (शनिवार, १४ जुलै) लोणंदकडून तरडगावकडे मार्गस्थ झाली. दुपारी माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिलं उभं रिंगण चांदोबाचा लिंब इथं पार पडेल. दरम्यान आज दुपारी सांस्कृतीक मंत्री विनोद तावडे हे देखील वारीमध्ये सहभागी होतील आणि रिंगण सोहळ्यात उपस्थित रहातील.
तुकोबांची पालखी बारामतीहून काटेवाडीकडे मार्गस्थ
दरम्यान, तुकोबांची पालखी बारामतीमधील मुक्काम संपवून काटेवाडीकडे मार्गस्थ झालीये... काटेवाडीमध्ये परिट समाजाकडून तुकोबांच्या पालखीचं स्वागत होईल.. काटेवाडीत तुकोबांच्या पालखीचं परिट समाजाकडून धोतरांच्या पायखड्या टाकून स्वागत होतं.. याच ठिकाणी दुपारी मेंढ्याचं रिंगण पार पडेल. तुकोबांच्या पालखीचा आजचा मुक्काम सणसर येथे असणार आहे.
पालखी तळाचे होणार सुशोभिकरण
दरम्यान, राज्य शासनानने आता तीर्थक्षेत्र विकास आराखडा योजने अंतर्गत पालखी तळ सुशोभिकरणाचं काम हाती घेतल आहे. भंडीशेगाव इथे घडीव आकर्षक दगडापासून भव्य असा पालखी तळ बनव्यात येत आहे. दोन्ही पालखी तळाच्या प्रवेश ठिकाणी आकर्षक अशा स्वागत कमानी बनवण्यात आल्या आहेत. या दोन्ही पालखी तळाच्या स्वच्छतेचं काम अंतिम टप्प्यात आल्याचं प्रांताधिकारी सचिन ढोल यांनी सांगितलंय. पालखी तळावर भाविकासाठी अतिरिक्त कायमस्वरूपी शौचालयाची उभारणीही करण्यात आली आहे.