Anganwadi Workers: राज्यातील अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीसांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. महिला व बालकल्याण विभागाकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. त्यानुसार अंगणवाडी कर्मचा-यांना एकरकमी लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  या  निर्णयामुळे 1 एप्रिल 2022 पासूनच्या सुमारे 5 हजार 605 अंगणवाडी कर्मचा-यांना एकरकमी लाभ मिळणार आहे. त्यामध्ये अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी रुपये १ लाख पर्यंत तर मिनी अंगणवाडी सेविका / अंगणवाडी मदतनीस यांना प्रत्येकी रुपये 75 हजार पर्यंत लाभ मिळणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता


एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या 1 एप्रिल 2022 पासून ते त्यांना ग्रॅच्युईटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू आणि सेवेतून काढून टाकणे इ. प्रकरणी शासनामार्फत एकरकमी लाभ एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून देण्यास 25 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

   

हा लाभ देताना शासन निर्णय 30 एप्रिल 2014 मध्ये नमूद  केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत देण्यास आणि याकरिता येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. 

तर योजना बंद


अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी लागू करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय भविष्यात घेतल्यास त्या शासन निर्णयाच्या दिनांकापासून एकरकमी लाभाची योजना बंद करण्यात येईल, असेही मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले.